
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे काही दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर आले होते, व्लादीमीर पुतिन यांच्या या दौऱ्याकडे अमेरिकेसह सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. पुतिन यांचा हा दौरा रशिया आणि भारत अशा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा होता. पुतिन भारत दौऱ्यावर असताना भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. तसेच भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कधीच कमी पडू देणार नाही अशी घोषणाही पुतिन यांनी केली. दरम्यान भारत आणि रशियामध्ये वाढत असलेली ही मैत्री अमेरिकेसाठी आता डोकेदुखी ठरत असल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशिया आणि भारतामधील व्यापार वाढल्याचं समोर आलेल्या आकेडवारीवरून स्पष्ट झालं आहे. दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर आता रशियाचे भारतामधील राजदूत डेनिस अलीपोव यांनी दोन्ही देशांच्या मैत्रीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. रशियाने कधीही इतर देशाच्या किंमतीवर भारतासोबत मैत्री केली नाही तर भारत हा आमचा खरा मित्र आहे. राष्ट्रपती पुतिन यांचा भारत दौरा हा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा होता, यादरम्यान अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. भारत हा रशियाचा खूप महत्त्वाचा आर्थिक आणि राजकीय पार्टनर आहे, भारत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे, असं अलीपोव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान व्लादीमीर पुतिन यांनी आपल्या भारत दौऱ्यामध्ये म्हटलं होतं की, भारत आणि रशियाची ही मैत्री कोणत्या देशाच्या विरोधात नाहीये, तर आपल्या देशांचं आर्थिक आणि राजकीय संरक्षण करणं हा या मैत्री मागचा उद्देश आहे. पुतिन यांचं हे वक्तव्य अमेरिकेनं भारतावर टाकलेल्या टॅरिफ दबावाच्या पार्श्वभू्मीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे आता रशियाच्या या नव्या विधानामुळे अमेरिकेचा चांगलाच जळफळाट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची रशिया आणि चीन सोबत निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र भारत आणि रशियाची मैत्री आणखी वाढू नये अशी अमेरिकेची इच्छा आहे, त्यामुळे आता अमेरिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.