
अहमदाबादमध्ये झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघाताने महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एअर इंडियाच्या AI 171 विमानाला अहमदाबादजवळ अपघात झाला. या भीषण अपघातात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह विमानातील सर्व २४१ जणांचा मृत्यू झाला. हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जात होतं. यातील मृतांमध्ये मुंबई, पनवेल, डोंबिवली आणि सोलापुरातील रहिवाशांचा समावेश आहे. या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटीलचा मृत्यू झाला. ती एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती.
पनवेल तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी असलेली २३ वर्षीय मैथिली मोरेश्वर पाटील या अपघातात मृत्युमुखी पडली. अहमदाबादमध्ये मृत्यू झालेली मैथिली ही क्रू मेंबर्सपैकी एक होती. एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेली मैथिली गेल्या दोन वर्षांपासून या क्षेत्रात होती. परवा दुपारी तिने आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर ती मुंबईहून अहमदाबादसाठी रवाना झाली.
त्यानंतर काल सकाळी ११ वाजता तिने आई-वडिलांशी शेवटचा संपर्क साधला होता. न्हावा येथून निघालेली मैथिली मुंबईमार्गे अहमदाबाद विमानतळावर पोहोचली. तिने याच विमानात आपली ड्युटी सुरू केली. काही क्षणातच ही दुर्घटना घडली. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच मैथिली अशाप्रकारे जग सोडून गेल्याने पाटील कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मैथिलीने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण केले होते. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.
तर दुसरीकडे डोंबिवलीची रोशनी सोनघरे आणि सोलापूरचे पवार दाम्पत्यही अपघातात बळी पडले आहेत. या भीषण दुर्घटनेत डोंबिवलीची रोशनी सोनघरे हिचाही मृत्यू झाला आहे. रोशनी अपघातग्रस्त विमानात फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. या अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी असलेले महादेव तुकाराम पवार (वय ६७) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (वय ५५) यांचाही मृत्यू झाला आहे. ते त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांचा एक पुत्र अहमदाबादमध्ये, तर दुसरा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करतो. १५ दिवसांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी भावांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक मुलगी आणि दोन मुले आहेत.
दरम्यान एअर इंडियाचे AI 171 हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या विमानात १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगालचे आणि १ कॅनडाचा नागरिक असे एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. या अपघातामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.