Ahmedabad plane crash : विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? पायलटची शेवटची ऑडिओ क्लिप अखेर समोर

या विमानानं लंडनला जाण्यासाठी अहमदाबादवरून उड्डाण केलं आणि अवघ्या काही सेकंदामध्येच या विमानाचा अपघात झाला. अपघात घडण्यापूर्वी विमानाचा पायलट सुमित सभरवाल यांनी अहमदाबाद एअर ट्राफिक कंट्रोलला एक संदेश पाठवला होता

Ahmedabad plane crash : विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? पायलटची शेवटची ऑडिओ क्लिप अखेर समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2025 | 5:41 PM

अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या अपघातासंदर्भात आता एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं एअर ट्राफिक कंट्रोलला (एटीसी) पाठवलेला शेवटचा संदेश समोर आला आहे. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा या विमानामध्ये दोन पायलट आणि बारा क्रू मेंबरसह 242 प्रवाशी होते, हा अपघात इतका भयंकर होता की, या अपघातमधून फक्त एक प्रवाशी वाचला आहे, बाकी सर्वांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये 275 लोकांचा मृत्यू झाला.

या विमानानं लंडनला जाण्यासाठी अहमदाबादवरून उड्डाण केलं आणि अवघ्या काही सेकंदामध्येच या विमानाचा अपघात झाला. अपघात घडण्यापूर्वी विमानाचा पायलट सुमित सभरवाल यांनी अहमदाबाद एअर ट्राफिक कंट्रोलला एक संदेश पाठवला होता, हा शेवटचा संदेश आता समोर आला आहे. ‘ मेडे.. मेडे.. मेडे.. नो पावर…. नो थ्रस्ट… गोइंग डाउन’ असं सभरवाल यांनी म्हटल्याचं या ऑडिओमधून समोर आलं आहे.

या विमान अपघातामधून केवळ एक प्रवासी वाचला आहे, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. या विमानानं लंडनला जाण्यासाठी अहमदाबादमधून उड्डाण केलं, मात्र त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच विमानाची उंची कमी होत गेली, आणि हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर जाऊन आदळलं.या अपघातामध्ये प्रवाशांचा तर मृत्यू झालाच मात्र या वसतिगृहात असणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे आणि आगीचे प्रचंड लोट उठल्याचं पाहायला मिळालं.

ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानाचा एक ब्लॅक बॉक्स हाती लागला आहे, तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे. या ब्लॅक बॉक्समधून विमान अपघाताचं नेमकं कारण आता समोर येण्याची शक्यता आहे, विमान अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे.