कोलंबियातील 80 पाणघोड्यांचे प्राण वाचवा, अनंत अंबानी यांचं आवाहन; वनताराचा मोठा प्रस्ताव
कोलंबियातील 80 पाणघोडे वाचवण्यासाठी वनताराचे संस्थापक अनंत अंबानी पुढे आले आहेत. अनंत अंबानी यांनी कोलंबिया सरकारला औपचारिक संदेशही पाठवला आहे. कोलंबियातील एका नदीकिनारी राहणाऱ्या पाणघोड्यांची संख्या 200 पेक्षा जास्त झाल्याने इतर जीवांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनंत अंबानी यांनी या 80 प्राण्यांना सुरक्षितपणे पकडणे, त्यांचे स्थलांतर करणे आणि त्यांची आयुष्यभर देखभाल करण्यासाठी मदत देण्याची ऑफरच कोलंबिया सरकारला दिली आहे.

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशातील मॅग्डालेना नदी खोऱ्यात राहणाऱ्या 80 पाणघोड्यांना मारण्याचा आदेश देण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव आणि संवर्धन केंद्रांपैकी एक असलेल्या वनताराचे संस्थापक अनंत मुकेश अंबानी यांनी कोलंबिया सरकारला औपचारिकरित्या या हिप्पोंचे (पाण घोडे) प्राण वाचवण्याची विनंती केली आहे. या पाणघोड्यांचे प्राण वाचावे म्हणून मानवतेच्या दृष्टीकोणातून अनंत अंबानी यांनी कोलंबिया सरकारला एक पर्यायही सूचवला आहे. या प्राण्यांना सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या ‘वनतारा’मध्ये आणावे, या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी निवारा देऊ, अशी ऑफरच अनंत अंबानी यांनी दिली आहे.
अनंत अंबानी यांनी या पाणघोड्यांचे प्राण वाचवण्यासाठी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री आयरीन वेलेझ टोरेस यांना पत्र लिहून तशी विनंती केली आहे. या प्रक्रियेत कोलंबियातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि मंजुरीसह संपूर्ण मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. हा प्रस्ताव प्राण्यांच्या कल्याणासाठी अनंत यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. यासाठी त्यांना नुकताच ‘ग्लोबल ह्यूमेन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले असून, हा सन्मान मिळवणारे ते सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती आहेत.
ती जबाबदारी आपलीच
या संदर्भात अनंत अंबानी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे 80 पाणघोडे संवेदनशील प्राणी आहेत आणि बदलत्या परिस्थितीचे बळी ठरले आहेत. जर आपल्याकडे त्यांना सुरक्षित आणि मानवी पद्धतीने वाचवण्याची क्षमता असेल, तर ते करण्याची जबाबदारी आपलीच आहे, असं अनंत अंबानी म्हणाले.
करुणा आणि प्राण्यांचे संरक्षण हे एकमेकांच्या विरोधात नाहीत. योग्य वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियोजनबद्ध काम केल्यास समुदाय आणि निसर्गाचे रक्षण करताना प्राण्यांचे जीवही वाचवता येतात. वनताराकडे हे कार्य करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञता आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विशेष योजना सादर
वनताराने कोलंबियातील अधिकाऱ्यांना एक सविस्तर योजना सादर केली आहे. यामध्ये पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, जैव-सुरक्षा प्रोटोकॉल आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखी सुविधा निर्माण करण्याचा समावेश आहे. वनताराने औपचारिकरित्या विनंती केली आहे की, या पर्यायावर पूर्णपणे विचार होईपर्यंत प्राण्यांना मारण्याचा निर्णय पुढे ढकलावा. तसेच, कोलंबियातील अधिकाऱ्यांसोबत थेट समन्वय साधून सविस्तर वैज्ञानिक, कार्यात्मक आणि प्राणी कल्याणावर आधारित प्रस्ताव मांडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
हा प्रस्ताव वनताराच्या “प्रत्येक जीव अमूल्य आहे” या मूलभूत विचाराचे प्रतीक आहे. तसेच, वन्यजीवांशी संबंधित जटिल जागतिक समस्यांसाठी मोठ्या प्रमाणावर विज्ञानाधारित उपाय देण्यात भारताची वाढती भूमिका देखील अधोरेखित करतो. या योजनेची अंमलबजावणी कोलंबिया आणि भारत सरकारांच्या आवश्यक मंजुरीनंतर तसेच संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांच्या परवानगीनंतरच केली जाईल.
नेमकं काय घडलं?
कोलंबियाच्या मॅग्डालेना नदी खोऱ्यात सुमारे 200 पाणघोडे आहेत. हे पाणघोडे 1980 च्या दशकात आणलेल्या एका लहान गटाचे वंशज आहेत. मात्र, कोलंबियाच्या जंगलात नैसर्गिक भक्षकांचा अभाव आणि अनुकूल वातावरणामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे स्थानिक जैवविविधता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी 80 प्राण्यांना मारण्याची परवानगी दिली होती. मात्र, ही माहिती मिळताच या प्राण्यांना वाचवण्यासाठी वनताराने पुढाकार घेतला आहे.
वनतारा विषयी
गुजरातमधील जामनगर येथे स्थित ‘वनतारा’ हे जगातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक वन्यजीव बचाव, देखभाल आणि संवर्धन केंद्रांपैकी एक आहे. येथे हत्ती, वाघ, सिंह (बिग कॅट्स), प्रायमेट्स, सरपटणारे प्राणी आणि इतर सस्तन प्राण्यांसाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय सेवा, दीर्घकालीन देखभाल आणि विशेष सुविधा उपलब्ध आहेत. हे सर्व प्राणी संकट, शोषण किंवा विस्थापनातून वाचवलेले आहेत.
वनतारा जगभरातील संवर्धन संस्था, राष्ट्रीय सरकारे आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणांसोबत काम करते. सीमा ओलांडून प्राण्यांचे बचाव, पुनर्वसन आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर (ट्रान्सलोकेशन) यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
नैसर्गिक अधिवास पुनर्संचयित करणे, स्थानिक समुदायांचा सहभाग, आनुवंशिक प्रोफाइलिंग आणि विज्ञानाधारित संवर्धन यावर लक्ष केंद्रित करून वनतारा एक सक्षम पर्यावरणीय प्रणाली निर्माण करत आहे, जिथे वन्यजीव सुरक्षितपणे वाढू शकतात. तसेच, लुप्तप्राय प्रजातींना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याच्या (रीवाइल्डिंग) दिशेनेही ते कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी: vantara.in
मीडिया संपर्क:
media@vantara.in
+91 70160 12345