आमदाराच्या मुलीचं लग्न, थेट पाकिस्तानी पाहुण्यांना निमंत्रण; तब्बल 10 एकरांत असणारं भव्य मंडप
आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नासाठी तब्बल 10 एकर जमिनीवर भव्य मंडप उभारला जात आहे. मात्र, लग्नातील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनंत सिंह यांनी स्वतःच पाकिस्तानातूनही पाहुणे येणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

बिहारमधील मोकामाचे आमदार सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या मुलीचे लग्न. आमदार अनंत सिंह यांची धाकटी मुलगी शिवांगी हिचे लग्न होणार आहे. या लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता आहे. याबद्दल खुद्द अनंत सिंह यांनीही मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या खुलाश्यानंतर एकच खबळ उडाली आहे. त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, लग्नाचे आमंत्रण केवळ बिहार किंवा भारत देशापुरते मर्यादित नसून त्यांच्या लेकिच्या लग्नासाठी थेट पाकिस्तानातूनही पाहुणे हजेरी लावणार आहेत.
आपले चाहते हे देश विदेशामध्ये आहेत. सर्वांना आमंत्रित केलं जात असून लग्नाची तयारी जोरा असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. आज दिवाळीच्या दिवशीच ही पत्रकार परिषद पार पडली.
नेमकं काय म्हणाले आमदार?
तुमच्या मुलीच्या लग्नाला कोण कोण येणार आहे. हा प्रश्न विचारल्यावर आमदार महोदयांनी उत्तर दिलं. अनंत सिंह म्हणाले की, सर्व ओळखीच्या लोकांना पत्रिका पाठवल्या जात आहेत. फक्त त्यांच्या पौढ मित्रांनाच लग्नासाठी आमंत्रण दिलं जात आहे, ज्यांचे मोबाईल नंबर आपल्याकडे आहेत, जे आपल्याशी संपर्कात आहेत आणि जे संपर्क साधत आहेत त्यांनाही आपण निमंत्रण देत आहोत, असं म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की शिवांगीच्या लग्नाला केवळ बिहारमधीलच नव्हे तर भारत आणि पाकिस्तानमधूनही पाहुणे उपस्थित राहणार आहेत. आमचे चाहते हे केवळ बिहारपुरते मर्यादित नाहीत. ते परदेशातही आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी निमंत्रण पाठवली जात असून ते सगळे येणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानातून पाहुणे येणार असं म्हटल्यानंतर अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
कुठे होणार लग्न?
अनंत सिंह यांचे मूळ गाव, नादवान, लाडमा येथे आहे. लग्नाची तयारी आधीच सुरू झाली आहे. हा विवाहसोहला दहा एकर जागेवर पार पडणार आहे. एक भव्य मंडप उभारला जात आहे. तंबू आणि इतर साहित्याची ऑर्डर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातून मजूर आणण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी चक्क विदेशी फुलांचा वापरही केला जाणार आहे, त्यामुळे हा विवाहसोहळा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.