Anant Singh Networth: सोनं-चांदी, जमीन, घोडे.. मुलीच्या लग्नावर कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या आमदाराच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क!
विशेष म्हणजे, होणाऱ्या जावयाला अनंत सिंह सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीची लँड रोव्हर डिफेंडर आणि बीएमडब्ल्यू या गाड्या भेट देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवांगीच्या लग्नाची चर्चा बिहारसह देशभरात रंगली आहे.

Anant Singh Networth: बिहारमधील मोकामा मतदारसंघाचे आमदार अनंत सिंह सध्या त्यांच्या मुलीच्या शाही लग्नामुळे चर्चेत आले आहेत. अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिचा विवाह 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लग्नाची तयारी एखाद्या राजेशाही सोहळ्याप्रमाणे सुरू आहे. लग्नासाठी करण्यात येणारी सजावट, पाहुण्यांची व्यवस्था, खाद्यपदार्थ आणि जावयाला देण्यात येणाऱ्या महागड्या भेटवस्तू यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या शाही विवाहाच्या निमित्ताने अनंत सिंह यांच्या संपत्तीचा आकडाही समोर आला आहे.
100 कोटींची संपत्ती, 25 कोटींचं कर्ज
अनंत सिंह यांनी 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. त्यानुसार, त्यांची आणि कुटुंबाची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यावर सुमारे 25 कोटी रुपयांचं कर्जही आहे. त्यांच्या आणि कुटुंबीयांकडे मिळून सुमारे 50 लाख रुपयांची रोकड असून, विविध बँक खात्यांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे.
सोनं-चांदी आणि महागड्या गाड्यांची मालकी
अनंत सिंह यांच्याकडे सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. तर त्यांच्या पत्नींकडे 701 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्यांची किंमत सुमारे 63 लाख रुपये आहे. याशिवाय सहा किलो चांदीचे दागिने असून, त्यांची किंमत जवळपास नऊ लाख रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. गाड्यांच्या बाबतीतही त्यांच्याकडे महागड्या वाहनांचा ताफा आहे. अनंत सिंह यांच्या नावावर टोयोटा फॉर्च्युनर, टोयोटा लँड क्रूझर आणि महिंद्रा SUV500 या गाड्या आहेत. त्यांची एकूण किंमत सुमारे 2.55 कोटी रुपये आहे. त्यांच्या पत्नींकडेही इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर सिग्मा आणि महिंद्रा थार यांसारख्या गाड्या आहेत. याशिवाय त्यांच्याकडे घोडे, गायी आणि म्हशींसारखे पशुधनही आहे.
जमीन आणि कोट्यवधींच्या इमारती
अनंत सिंह आणि त्यांच्या पत्नींच्या नावावर कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये सहा कोटी रुपयांची शेतजमीन आणि सुमारे 25 कोटी रुपयांची बिगरशेती जमीन आहे. पाटणा इथं त्यांच्या नावावर दहा कोटी रुपयांची व्यावसायिक इमारत, तर पत्नींच्या नावावर 13 कोटी रुपयांची व्यावसायिक इमारत आहे. याशिवाय दोघांच्या नावावर मिळून 3.4 कोटी रुपये किमतीची दोन घरं आहेत. बांधकाम क्षेत्रातील कंपनीतही त्यांचा मोठा हिस्सा आहे.
मुलीच्या लग्नासाठी शाही तयारी
आता शिवांगीच्या लग्नासाठी तब्बल 10 बिघा जागेत भव्य मंडप उभारला जात आहे. या मंडपाला ताजमहाल आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याची झलक देण्यात येणार आहे. लग्नाला सुमारे चार लाख पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी 150 हून अधिक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जाणार आहेत. देशभरातून येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांसाठी हेलिपॅडची व्यवस्थाही केली जात आहे. पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येणार असून, विजेत्यांसाठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
