Sonam Wangchuk : अंत पाहू नका…अण्णा हजारेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारला थेट इशारा!

दिल्लीमधील सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात त्यांनी आंदोलन पुकारलेले आहे. वांगचूक यांच्यासोबत अन्य काही विद्यार्थीदेखील अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत.

Sonam Wangchuk : अंत पाहू नका...अण्णा हजारेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारला थेट इशारा!
anna hazare and sonam wangchuk
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2026 | 6:19 PM

Anna Hazare And Delhi Protest : सध्या राजधानी दिल्लीमध्ये जंतर-मंतरच्या मैदानावर मोठं आंदोलन सुरू आहे. गेल्या 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षण क्षेत्रात मोठं काम करणारे सोनम वांगचूक बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाच्या 21 व्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. सध्या सोनम वांगचूक यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु त्यांनी अन्न खाण्यास विरोध केला असून माझे हे आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका घेतली आहे. या आंदोलनाची चर्चा आता देशभरात होत आहे. अनेक सिने अभिनेते, अभिनेत्रींनी वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे काही राजकीय नेते मंडळीदेखील सोनम वांगचूक यांची भेट घेऊन आले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सरकारने अंत पाहू नये

जन लोकपाल विधेयक लागू करण्यासाठी तसेच, देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा यासाठी अण्णा हजारे यांनी 2011 साली मोठे आंदोलन उभे केले होते. त्यांच्या या आंदोलनलामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव झाला. आजही अण्णा हजारे यांच्या भूमिकेला तेवढेच महत्त्व आहे. त्यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रकारे त्यांन वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारने वांगचूक यांचा अंत पाहू नये. गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचूक यांचे आंदोलन सुरू असून सरकारने त्याचा अंत पाहण्याची भूमिका घेऊ नये, असं परखड मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.

दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय?

दिल्लीमधील सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात त्यांनी आंदोलन पुकारलेले आहे. वांगचूक यांच्यासोबत अन्य काही विद्यार्थीदेखील अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. पोलिसांनी वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जंतर मंतरवर काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली. हा लढा आथा आणखी तीव्र होईल, असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिलेला आहे. आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा हवा आहे, अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे भाषण करताना त्यांच्यावरही शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेक करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या आंदोलनात पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us