
शेजारच्या देशांची जमीन बळकावण्याचा चीनचा इतिहास कोणापासूनही लपलेला नाही. चीन नेहमी शेजारील देशांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत राहतो. तिबेटपासून लडाख आणि डोकलामपर्यंत ड्रॅगनने आपले विस्तारवादी धोरण राबवले. चीनने नेहमीच शेजारील देशांच्या भूमीवर वाईट नजर ठेवली आहे. आता चीनचे लक्ष भूतानच्या जमिनीवर आहे. चीन भूतानमध्ये गावे वसवत आहे. वादग्रस्त भागात आपले सैन्य आणत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा भूतानसोबतच्या मजबूत संबंधांचा संदेश दिला आहे. यासाठी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी चार दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे चीन टेन्शनमध्ये आला आहे.
जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा हा पहिला भूतान दौरा आहे. ३० जून ते ३ जुलै असा त्यांचा दौरा आहे. दोन्ही देशांसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात जनरल द्विवेदी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतील. तसेच रॉयल भूतान आर्मीचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट जनरल बटू त्शेरिंग यांच्याशी धोरणात्मक चर्चा देखील करणार आहे.
चीनने अलिकडेच एक नवीन वाद सुरू केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमेजवळ भूतानच्या पूर्वेला हे साक्तेंग वन्यजीव अभयारण्य आहे. चीननेही यावर आपला दावा मांडला होता. अर्थात भूताने चीनचा दावा फेटाळला होता. चीनची सीमा थेट साक्तेंग अभयारण्याशी जोडलेली नाही. त्यानंतरही चीन दावा करत आहे. चीन या भागाला वादग्रस्त म्हणत आहे.
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) रॉयल भूतान आर्मीला (आरबीए) त्यांच्या या भूमीवर गस्त घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. डोकलामजवळील अमो-छू नदीच्या काठावर भूतानच्या सैनिकांना रोखण्यात आले. या प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये ध्वज बैठक घ्यावी लागली होती.
भारत आणि भूतानमधील संबंध मैत्री, सहकार्य आणि विश्वासावर आधारित आहेत. भूतानचे बहुतेक धोरणात्मक प्रशिक्षण भारताच्या लष्करी संस्थांमध्ये होते. भारत भूतानचा व्यापार आणि विकास भागीदार देखील आहे. यामुळे जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा भूतान दौरा महत्वाचा आहे.