
ईशान्य भारतातून मोठी बातमी समोर आली आहे. आसाममधील कार्बी आंगलोंगमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलीसांना लाठीमार करावा लागला. जमावाला पांगण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी जमावाने 3 दुचाकींना आग लावली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता हा हिंसाचार इतर जिल्ह्यांमध्येही पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आसाममधील पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील चराई जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्यांना हटवण्यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बीएनएसचे कलम 163 लागू केले आहे. पुढील आदेशापर्यंत हे कलम लागू असणार आहे. हा निर्णय असामाजिक घटकांना जातीय किंवा सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यापासून रोखण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे.
जिल्हा दंडाधिकारी निरोला फांगचोपी यांनी संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. संध्याकाळी 5 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांवर आणि खाजगी वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात रॅली, धरणे आंदोलन, मिरवणुका, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने, फटाके फोडणे, प्रक्षोभक भाषणे, पोस्टर्स आणि परवानगीशिवाय लाऊडस्पीकरचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पोलिस, निमलष्करी दल आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. वैद्यकीय आपत्कालीन सेवांना यातून सूट देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे (परीक्षांसाठी), सरकारी आणि खाजगी कार्यालये नेहमीप्रमाणे खुली असणार आहेत.
आंदोलकांनी व्हिलेज ग्राझिंग रिझर्व्ह (व्हीजीआर) आणि प्रोफेशनल ग्राझिंग रिझर्व्ह (पीजीआर) जमिनींवर बेकायदेशीर कब्जा करणारांना बाहेर काढण्याची मागणी केली आहे. यातील बहुतेक लोक बिहारमधील आहेत. या आंदोलनात 22 तारखेला आंदोलकांनी कार्बी आंग्लोंग ऑटोनॉमस कौन्सिल (केएएसी) चे मुख्य कार्यकारी सदस्य (सीईएम) तुलीराम रोंगांग यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली होती, त्यामुळे हे आंदोलन चिघळले आहे.