
5 जुलैची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतशी जपानमधील लोकांमध्ये भीती वाढत आहे. जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायो तातसुकी यांनी वर्तवलेल्या भाकीताची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. जपानमधील नागरिकांनी या भाकीताचा एवढा धसका घेतला आहे, की अनेकांनी तर आपले नियोजित दौरे आणि विमान प्रवास देखील रद्द केला आहे.
नेमकी काय आहे भविष्यवाणी?
जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायो तातसुकी यांनी 5 जुलै संदर्भात मोठं भाकीत वर्तवलं आहे. जपानमध्ये पाच जुलैला शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामी येणार असल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.रायो तातसुकी यांच्या या नव्या भाकीतामुळे जपानी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तातसुकी यांना जपानी बाबा वेंगा म्हणून देखील ओळखलं जातं. कारण त्यांनी यापूर्वी जे भाकीत केलं होतं ते खरं ठरल्याचा दावा, त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. 1999 मध्ये त्यांनी The Future I saw नावाचं एक मेगा कॉमिक्स प्रकाशीत केलं होतं, त्यामध्ये त्यांनी जपानमध्ये 2011 साली एक मोठी आपत्ती येणार असल्याचं भाकीत केलं होतं, आणि त्यांचं हे भाकीत खरं ठरल्यामुळे त्यांना जपानी बाबा वेंगा अशी नवी ओळख मिळाली. 2011 साली जपानमध्ये त्सुनामीचं मोठं सकंट आलं होतं.
तातसुकी यांच्या कॅमिकक्सची शेवटची आवृत्ती 2021 मध्ये प्रकाशित करण्यात आली, या कॅमिक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये शक्तिशाली भूकंप येणार आहे.सध्या सोशल मीडियावर ही पोष्ट प्रचंड व्हायरल होत आहे. जपानच नाही तर इंडोनेशियामधील नागरिकांनी देखील या भाकीताचा एवढा धसका घेतला आहे की, अनेकांनी या काळातील आपले सर्व प्रवास आणि यात्रा रद्द केल्या आहेत. तसेच नियोजित विमान प्रवास देखील रद्द केला आहे. अनेकांनी प्रवासादरम्यान राहण्याची व्यवस्था म्हणून हॉटेलचं देखील बुकिंग केलं होतं, मात्र आता या लोकांनी आपलं हॉटेल बुकिंग देखील रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)