
Uttarakhand Bypolls Result 2024: लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा भाजपने दिला होता. परंतु स्वबळावर बहुमत भाजपला मिळाले नाही. ज्या अयोध्येत राम मंदिर झाले, ज्या अयोध्येत अनेक विकास कामे झाली, त्याठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत लोकसभेप्रमाणे कल राहिला. अयोध्येनंतर आणखी एका धर्मनगरीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत अयोध्या, प्रयागराज, चित्रकूट, नासिक आणि रामेश्वरम या धार्मिक ठिकाणांवर भाजप उमेदवार पराभूत झाले होते. यापूर्वी बद्रीनाथची जागा काँग्रेसकडे होती. परंतु काँग्रेस आमदार राजेंद्र भंडारी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली.
बद्रीनाथमध्ये भाजपचा पराभवानंतर चर्चा सुरु झाली आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या विकास कार्यामुळे स्थानिक लोक आणि पुजारी नाराज झाले का? काही महिन्यांपूर्वी स्थानिक लोक आणि पुजारींनी आंदोलनही केले होते. या ठिकाणी व्हिआयपी दर्शन सुविधेमुळे सामान्य लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे दर्शन सुविधा सुरु करण्याची मागणी स्थानिक लोक करत आहेत.
चारधाम संदर्भात केंद्र सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे. या मास्टर प्लॅनवर स्थानिक लोक नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी होणाऱ्या विकास कार्यांमुळे कसे नुकसान होईल? यासंदर्भात अभ्यास केला नसल्याचे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.
पोटनिवडणुकीत बद्रीनाथची जागा काँग्रेसने जिंकली आहे. यापूर्वी 2022 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर राजेंद्र भंडारी विजयी झाले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपची साथ घेतली. भाजपनेही त्यांना बद्रीनाथ मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण राजेंद्र भंडारी लोकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत. काँग्रेसचे उमेदवार लखपत बुटोला यांना जनतेने विजयी केले. उत्तराखंडमधील मंगळूरच्या जागेवरही भाजपचा पराभव झाला. या ठिकाणी काँग्रेसचे काझी निजामुद्दीन अवघ्या ४४९ मतांनी विजयी झाले. या दोन्ही जागांवर १० जुलै रोजी पोटनिवडणूक झाली होती.