भारतीय मजदूर संघाने जगाला शाश्वत मॉडेल दिले, सरसंघचालक मोहन भागवतांकडून संघटनेचे कौतुक

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील के.डी. जाधव कुस्ती हॉल येथे भारतीय मजदूर संघाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.

भारतीय मजदूर संघाने जगाला शाश्वत मॉडेल दिले, सरसंघचालक मोहन भागवतांकडून संघटनेचे कौतुक
| Updated on: Jul 23, 2025 | 7:22 PM

भारतीय मजदूर संघाचा (BMS) आज वर्धापन दिन आहे. ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षासी संलग्न नाही. कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ही संघटना काम करते. ही संघटना कशी सुरु झाली, यामागे काय संकल्पना होती? संघटनेने आतापर्यंत काय काम केले, पुढील लक्ष्य काय आहे? या आढावा वर्धापन दिनी घेतला जातो. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील के.डी. जाधव कुस्ती हॉल येथे भारतीय मजदूर संघाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘Organiser Weekly’ च्या ‘Laborious Resetting’ या विशेष अंकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, ‘वर्धापन दिस साजरा करणे हा केवळ स्मरणोत्सव नाही, तर मूल्ये आणि दृष्टिकोन यांनी प्रेरित झालेली एक चळवळ आहे. दत्तोपंत ठेंगडी यांनी ‘मजदूर संघ’ या नावाने ही संघटना सुरू केली. सुरुवातीला संघटना फारच लहान होती. इतर लोक या संघटनेला म्हणायचे की ‘तुमचा भगवा झेंडा या क्षेत्रात फडकू शकत नाही. आमच्या ‘Workers, Unite the World’ या विचारसरणीवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आज 70 वर्षांनंतर ठेंगडीजींची दूरदृष्टी खरी ठरली आहे. हे BMS च्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.’

डॉ. मोहन भागवत यांनी एक प्रसंग सांगताना म्हटले की, 1980 मध्ये संघटनेच्या अधिवेशनात डॉ. एम.जी. गोखले, जे एक प्रसिद्ध कम्युनिस्ट होते, ते सहभागी झाले होते. त्यांच्या घरासमोर शाखा भरायची आणि त्या माध्यमातून ते संघाच्या विचारांशी जोडले गेले होते. एकदा त्यांनी म्हटले की, ‘भारतीय मजदूर संघ ही एकमेव संघटना आहे, जिच्याकडे पूर्ण विचारसरणी आहे, पण प्रणाली नाही.’ त्यावेळी ठेंगडीजींनी मान्य केले की, ‘आपली विचारसरणी चांगली आहे, पण आपली कार्यपद्धती अजून त्या विचारसरणीशी जुळत नाही. प्रणाली सुधारावी लागेल, तेव्हाच कृती आणि विचार एकत्र येतील.’ त्यानंतर आज आपण त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत.”

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “सनातन धर्मात जीवनाचे चार स्तंभ आहेत, त्यातील ‘परिश्रम’ हा एक आहे. मजदूर संघाने ने जगाला एक नवीन, शाश्वत मॉडेल देण्याचा प्रयत्न केला आहे. काळानुसार मॉडेल बदलावे लागत आहे, मात्र त्यात संतुलन असावे. पहिल्या पिढीने कार्य सुरू केले, दुसरीने ते टिकवले आणि आता तिसरी-चौथी पिढी दिशा समजून घेऊन संघटना पुढे नेईल.’

आणखी एक आठवण सांगताना भागवतांनी सांगितले की, “जेव्हा ठेंगडीजींना राज्यसभेसाठी निवडून दिले गेले होते, तेव्हा त्यांनी म.स. गोलवलकर गुरुजींना विचारले की, आता कामगारांसाठी काय करू. तेव्हा गुरुजींनी सांगितले की, ‘मुलाला आई जसे प्रेमाने सामावून घेते, तशी भावना मनात ठेवून कामगारांसोबत काम करा, तुम्हाला यश मिळेल. कारण भावनेतून केलेले कामच टिकते.”

ठेंगडीजींनी आधी इतर कामगार संघटनांमध्ये काम केले, पण त्या संघटनांमध्ये योग्य विचारसरणी नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांनी ‘राष्ट्र हित, उद्योग हित आणि मजदूर हित’ या तत्त्वांवर आधारित भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. आज ही संघटना संपूर्ण जगासाठी उदाहरण बनली आहे असेही भागवत यांनी म्हटले.

आपल्या संघटनेची विचारसरणी बळकट आहे, पण आपल्याला कार्यप्रणाली विकसित करण्याची गरज होती. आज नवे प्रश्न आहेत. असंघटित क्षेत्र खूप मोठे आहे, संघटित क्षेत्रातही अनेक लोक असंघटितच आहेत. त्यांच्या आत्मसन्मानाचे पुनरुज्जीवन करणे आपले काम आहे. तसेच तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढेल का? माणुसकी नष्ट होईल का? शारीरिक श्रम कमी झाले आहे, मात्र कष्ट न करणे ही आपली वृत्ती असणार नाही असंही भागवत म्हणाले.

भारतीय मजदूर संघ ही जगातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. सध्याच्या आधुनिक युगात ‘कामगार, उद्योग आणि राष्ट्रहित’ यांची सांगड घालण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यश हे शेवट नसते. जसे जुलियस सीझर यशशिखरावर असतानाही विस्मृतीत गेला, मात्र प्रभू राम राजसत्ता सोडून वनवासात गेले, ते आजही स्मरणात आहेत.

यावेळी बोलताना केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, भारतीय मजदूर संघाचे कार्य भारताच्या मूल्यव्यवस्थेवर आधारित आहे. आम्ही अनेक युनियनसोबत नियमित बैठक घेतो, पण भारतीय मजदूर संघाची कार्यपद्धती आणि दृष्टीकोन नेहमीच वेगळा आणि शिकण्यासारखा आहे. ही संघटना फक्त कामगार हक्कांसाठी लढत नाही, तर ठोस परिणाम देखील देते.

भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस रविंद्र हिमटे म्हणाले की, भारतीय मजदूर संघाच्या 70 वर्षांच्या प्रवासात अनेक महान व्यक्तींनी आपले संपूर्ण जीवन वाहिले. ऑगस्ट 2025 पासून पाच महिने चालणाऱ्या व्याख्यान मालिकेतून संपूर्ण देशभर जनजागृती करणार आहेत. ‘श्रमिक संपर्क अभियान’, महिला व युवक अधिवेशने, तसेच ‘पंच परिवर्तन’ या उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.

भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पांड्या म्हणाले की, “1995 मध्ये ‘राष्ट्र हित, उद्योग हित आणि मजदूर हित’ या तत्त्वांवर आधारित भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. लोकांनी विचारले गेले, मजदूरांचे हित तिसऱ्या क्रमांकावर का? पण आज भारतीय मजदूर संघ ही देशातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. 30 प्रांतांमध्ये संघटनेचे कार्य सुरू आहे.

व्ही भगिनाथ यावेळी म्हणाले की, ‘ही केवळ संघटनेची वर्षगाठ नसून विचारधारेचा विजय आहे. पाश्चिमात्य विचारांनंतर भारतात कामगारांमध्ये नियोक्त्यांविषयी अविश्वास निर्माण झाला. पण भारतीय परंपरेनुसार, भारतीय मजदूर संघाने योग्य मोबदला आणि सन्मान मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे. ‘Workers of the world, unite’ ऐवजी आम्ही ‘Workers, Unite the World’ असं म्हणतो.

दरम्याय या कार्यक्रमात भारतीय मजदूर संघाच्या दिल्ली युनिटच्या अध्यक्षा इंदू जमवाल यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘ई-कार्यकर्ता’ नावाचे नवे डिजिटल अ‍ॅप लाँच करण्यात आले. संघटनेच्या 70 वर्षांच्या प्रवासावर आधारित डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली. या कार्यक्रमानाला RSS चे वरिष्ठ पदाधिकारी, केंद्र सरकारचे मंत्री, दिल्लीचे महापौर, नेपाळचे शिष्टमंडळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच 110 ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.