
अमेरिका सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारत देखील अमेरिकेच्या या दबावाला न जुमानता प्रत्युत्तर देत आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे, मात्र भारतानं अमेरिकेला या आघाडीवर जोरदार धक्का दिला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतानं रशियाकडून करण्यात येणाऱ्या तेल खरेदीचा गेल्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड मोडला आहे, नोव्हेंबर महिन्यात भारतानं रशियाकडून रेकॉर्ड ब्रेक तेलाची खरेदी केली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणूनच अमेरिकेनं भारताव 50 टक्के टॅरिफ लावला होता, त्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी घोषणा देखील केली होती, मात्र अमेरिकेचा हा डाव अयशस्वी ठरल्यानंतर आता अमेरिकेकडून आणखी एक मोठा डाव टाकण्यात आला आहे, याचा थेट फटका अमेरिकेतल्या लाखो भारतीय लोकांना बसणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या वर्क परमिटचं नुतनीकरण करण्यासाठी भारतात आलेल्या हजारो एच1बी व्हिसाधारकांना मोठा धक्का बसला आहे. कारण अमेरिकेकडून अचानक अपॉइंटमेंट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आता थेट पुढच्याच वर्षी अपॉइंटमेंट संदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान यामुळे जे आपल्या व्हिसाचं नुतनीकरण करण्यासाठी भारतात आले होते, ते लोक भारतामध्येच अडकून पडले आहेत.
ट्रम्प यांच्या या धोरणामुळे हजारो भारतीय लोकांच्या अमेरिकेतील नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते अनेक जण अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे भारतात अडकले आहेत, त्यामुळे अमेरिकेत ते ज्या फर्मसाठी किंवा कंपनीसाठी काम करतात, ते किती दिवस वाट पाहणार? हा मोठा प्रश्न आहे. अपॉइंटमेंट रद्द झाल्यामुळे अमेरिकेत नोकरी करत असलेले जे लोक भारतात आले आहेत, ते अमेरिकेत परत कधी जाणार हा देखील मोठा प्रश्न आहे. सरकारकडून नवी सोशल मीडिया पॉलिसी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे या संदर्भातील निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण अमेरिकेकडून देण्यात आलं आहे.