
संपूर्ण देशाचे लक्ष सध्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. त्यानंतर आता राज्यात कुणाचे सरकार येणार याबाबत एक्झिट पोल समोर यायला सुरुवात झाली आहे. विविध टीव्ही चॅनेल आणि एजन्सींनी आता त्यांचे एक्झिट पोल निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यात बिहारमध्ये एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, तर महाआघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये कोणत्या युतीला किती जागा मिळणार याबाबत विविध संस्थांनी अंदाज बांधला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
Bihar Election POLSTRAT exit poll
बिहार निवडणुकीसाठी POLSTRAT ने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये NDA ला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. POLSTRAT नुसार, NDA ला 133-148 जागा, महाआघाडीला 87-102 आणि इतरांना 3-5 जागा मिळू शकतात. पक्षानुसार, भाजप 68-72 जागा, JDU 55-60, LJP (R) 9-12, HAM 1-2 आणि RLM 0-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पीपल्स पल्स एक्झिट पोलमध्येही एनडीए सरकार स्थापन करणार असल्याचे समोर आले आहे. या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 133-159 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाआघाडीला 75-101 जागा आणि जेएसपीला 0-5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 2-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
बिहार निवडणुकीसाठीचा चाणक्यने आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. ज्यामध्ये एनडीएला 130-138 जागा, महाआघाडीला 100-108 आणि इतरांना 3-5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिहारमध्ये 243 जागा आहेत. यासाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे. त्यानंतर आता 14 नोव्हेंबर रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. 14 तारखेला नितीश कुमार राज्यात त्यांचे सरकार पुन्हा स्थापन करणार की तेजस्वी हे बिहारचे नेतृत्व करणार हे स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसला मोठा झटका
बिहार विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 15 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये सर्वत्र फिरत प्रचार केला होता, मात्र मतदार त्यांच्या बाजूने कौल देण्याची शक्यता कमी असल्याते या एक्झिट पोल मधून समोर आले आहे.