
Maithili Thakur Viral Video : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची सध्या देशभरात चर्चा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मुक्यमंत्री होण्यासाठी नितीश कुमार आतुर आहेत. भाजपा आणि नितीश कुमार यांचा जेडीयू यांनी युती केलेली असून ते संयुक्तपणे ही निवडणूक लढवत आहेत. येथील सत्ताधारी भाजपा आणि नितीश कुमार यांनी तिकीट दिलेले काही उमेदवार चांगलेच चर्चेत आहेत. यामध्ये गायिका मैथिली ठाकूर ही तर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ती भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. दरम्यान, याच मैथिली ठाकूरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. विकासाच्या ब्लू प्रिंटविषयी विचारले असता ही तर खासगी बाब आहे, मी कसं सांगू असं अजब उत्तर मैथिली ठाकूरने दिले आहे. तिचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
भाजपाने मैथिली ठाकूरला अलिनगर या मतदारसंघातून तिकीट दिलेले आहे. आपल्या विजयासाठी मैथिली ठाकूर जोमात प्रचार करत आहे. कॉर्नर बैठका, सभांचा तिने धडाका लावला आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ती माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं देत आहे. अशाच एका पत्रकाराने मैथिलीला काही प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न हा विकासाच्या ब्लू प्रिंटचा होता. तुमचे ब्लू प्रिंट काय आहे? असे या पत्रकाराने विचारले. यावर बोलताना मैथिलीने “ब्लू प्रिंटविषयी मी तुम्हाला आता कॅमेऱ्यासमोर कसे सांगू. ही तर खूपच खासगी बाब आहे. पण मी ब्लू प्रिंटवर काम करत आहे. आमचा जाहीरनामा अगोदर सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहे. तो सगळीकडे गेलेला आहे,” असं मैथिली ठाकूरने म्हटलंय. तिचे हेच विधान सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहे.
मैथिली ठाकूरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. विकासाचा आराखडा ही खासगी बाब कशी असू शकते. हा आराखडा तर सर्वांना सांगायचा असतो, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. तसेच मैथिली ठाकुरला चुकीचे ऐकायला आले का? असेही विचारले जात आहे. दरम्यान, मैथिली ठाकूरचा जन्म 25 जुलै 2000 रोजी बिहारच्या मधुबनी येथे झाला. ती एक शास्त्रीय गायिका आहे. ती आपल्या दोन भावांना सोबत घेऊन गीत गाते. तिच्या गायनाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 2017 साली रायझिंग स्टार नावाचा गायन कार्यक्रमात ती उपविजेती ठरली होती. तेव्हापासून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आता तिने भाजपात प्रवेश केला असून ती अलीनगर येथून विधानसभेची निवडणूक लढवत आहे.