अंघोळीचा व्हिडीओ बनवत होत्या, अचानक पुराचं पाणी आलं अन्… किंचाळ्या ऐकताच धडाधड उड्या; असं काय घडलं?

बिहारच्या बेगूसरायमध्ये पुरात अंघोळीचा व्हिडीओ बनवताना दोन महिलांना जीव धोक्यात आला. अचानक पाण्याचा वेग वाढल्याने त्या गंगेच्या दिशेने वाहू लागल्या. किंचाळ्या ऐकून स्थानिक तरुणांनी धाडसीपणे पाण्यात उड्या मारल्या आणि त्यांचा जीव वाचवला. हा थरारक प्रसंग त्यांच्या रील्सच्या नादात घडला, जो पुराच्या धोक्याची आठवण करून देतो.

अंघोळीचा व्हिडीओ बनवत होत्या, अचानक पुराचं पाणी आलं अन्... किंचाळ्या ऐकताच धडाधड उड्या; असं काय घडलं?
Begusarai Flood
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 5:11 PM

बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक बातमी आहे. पुराच्या पाण्यात पोहण्याचा आणि त्याचा व्हिडीओ बनवण्याचा शौक दोन महिलांना चांगलाच भारी पडला आहे. दोन्ही महिला रस्त्यावर भरलेल्या कमरेएवढ्या पाण्यात अंघोळ करत होत्या. एक महिला त्यांचा मोबाईलवरून व्हिडीओ बनवत होती. तेव्हा अचानक पुराचं पाणी अत्यंत वेगाने आलं. त्यामुळे या दोन्ही महिला गंगेच्या दिशेने वाहून जायला लागल्या. आजूबाजूला लोक होते. पण त्यांना वाटलं या महिला पोहत आहेत. पण महिला बऱ्याच पुढे निघून गेल्या. किंचाळू लागल्या. त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं आणि नंतर जे घडलं ते…

बेगूसरायच्या बलिया प्रखंड येथील हे प्रकरण आहे. लखमिनियां- मसूदनपूर पथच्या चेचियाही ढाब येथे ही घटना घडली. गंगेचा जलस्तर वाढल्याने रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी आलं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग लावण्यात आल्या आहेत. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल म्हणून ही बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. याच बॅरिकेडिंगच्या आतून लोक ये-जा करताना दिसत आहेत.

नगरगामा येथे राहणाऱ्या दोन महिला माहेरी आल्या होत्या. आज दोन्ही महिला चेचियाही ढाब येथून जात होत्या. पुराच्या पाण्यात अख्खा रस्ता गेला होता. त्यामुळे दोघींनाही पाण्यात अंघोळ करण्याची इच्छा झाली. स्विमिंग करता करता रिल्स व्हिडीओ तयार करण्याची त्यांना हुक्की आली. एका महिलेने व्हिडीओ बनवायला घेतला. तेवढ्यात अचानक पाण्यााच प्रवाह वाढला. वेगाने पाण्याचा लोट आला. या दोन्ही महिला पाण्याच्या प्रवाहात सापडल्या. आणि पाण्याबरोबर वाहून जाऊ लागल्या.

त्या पोहत आहेत असं वाटलं…

रस्त्याच्या बाजूला लोक उभे होते. त्यांना वाटलं या महिला पोहत आहेत. त्यामुळे त्यांनी फार लक्ष दिलं नाही. पण दोन्ही महिला पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेगाने पुढे निघून गेल्या. गंगा नदीच्या दिशेने या महिला जात होत्या. त्यावेळी या महिलांनी किंचाळायला सुरुवात केली. जोरजोरात होणारी आरडाओरड लोकांच्या कानावर आली आणि काही तरी गडबड असल्याचं लोकांच्या लक्षात आलं.

त्याचवेळी स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात धाडधाड उड्या मारल्या. ते पोहत पोहत महिलेच्या दिशेने गेले. दोघींना पकडण्यासाठी या तरुणांना खूप दूरपर्यंत पोहत जावं लागलं. शेवटी दोन्ही महिलांना त्यांनी वाचवलं.

आणि बोट आली…

महिलांना पकडल्यानंतर नावेच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर दोन्ही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेला वाचवणाऱ्या गौरवने दिलेल्या माहितीनुसार, दोघी अचानक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्या. तिला वाचवण्यासाठी पोहत खूप दूरपर्यंत गेलो. दोघींना नावेच्या मदतीने वाचवण्यात आलं आहे.

या घटनेचा व्हिडीओ बनवणाऱ्या महिलेचा मोबाईलही पाण्यात बुडाला. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात या महिला अंघोळ करताना दिसत आहेत. तसेच थोड्यावेळाने त्या पाण्याच्या प्रचंड वेगाने वाहून जाताना दिसत आहेत.

चेचियाही ढाबमध्ये प्रत्येक वर्षी पूर येतो. गंगेचा जलस्तर वाढल्यानंतर या परिसरातील अनेक रस्ते पाण्यात गेले आहेत. या ठिकाणी आधीही पुरामुळे अशा घटना घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. नेहमी नेहमी दुर्घटना होत असल्यानेच यावेळी जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर बॅरिकेडिंग केली आहे. लोकांना पाण्यापासून सुरक्षित ठेवणं हा त्यामागचा हेतू होता. मात्र, बॅरिकेडिंग असतानाही या महिला पाण्यात उतरल्या आणि अंघोळ करू लागल्या.

पुराच्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे पाणी आत पर्यंत येणं खूप धोकादायक असतं. केवळ नशिब बलवत्तर म्हणून या महिला वाचल्या. काही तरुणांनी धडाधड उड्या मारल्याने ती वाचू शकली, असं स्थानिक रहिवाशी त्रिभुवन सिंह यांनी सांगितलं.

Follow Us