
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता देशाच्या उपराष्ट्रपतीपद रिक्त आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. हीच बाब लक्षात घेता सध्या दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक होत असून या बैठकीत एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असावा? यावर चर्चा चालू आहे. त्यामुळे लवकरच एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार आज (7 ऑगस्ट) दिल्लीत एनडीएच्या सर्व घटकपक्षांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि या निवडणुकीसाठी एनडीएच्या घटकपक्षांमधील समन्वय यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल, जेडीयूचे नेते राजवी रंजन सिंह लल्लन सिंह, शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी, टीडीपीचे नेते तथा केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, आरएलएसपीचे नेते उपेंद्र कुशवाह, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते उपस्थित आहेत.
तत्पूर्वी भारत निवडणूक आयोगाने नुकतेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना केली आहे. या अधिसूचनेनुसार येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. तर 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील. 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज वापस घेता येणार आहे. याच दिवशी मतमोजणी केली जाईल आणि निकाल जाहीर केला जाईल.
दरम्यान, जगदीप धनखड यांनी प्रकृतीचे कारण देऊन उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता उपराष्ट्रपदीपदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. एनडीएकडून कोणत्या नेत्याची निवड होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.