एक, दोन नव्हे तर 25 तरुणींना लग्नाच्या जाळ्यात ओढलं; भाजप आमदाराच्या मुलीलाही फसवलं
नराधमाने भाजप आमदाराच्या मुलीसह 25 तरुणींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींची आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना सिनेमात पाहिल्या असतील. समाजातही एक-दोन तरुणींची प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केल्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. परंतु एका नराधमाने भाजप आमदाराच्या मुलीसह 25 तरुणींची फसवणूक केल्याचा धक्कादायक कारनामा केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपीने या सर्व तरुणींची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील सीतापूरचे भाजप आमदार ज्ञान तिवारी यांनी मुलीसोबत व्हिडिओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे.
आमदाराने स्वत:च्या मुलीची मोठी फसवणूक झाल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सांगितले आहे. या प्रकारानंतर आमदाराने आरोपी प्रखर त्रिवेदीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रखर आणि त्यांची मुलगी प्रज्ञाचं 2024 साली लग्न झालं होतं. लग्नाच्या वेळी प्रखरने गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवली होती. त्याने लग्न करताना मुंबई रियल एस्टेट क्षेत्रात मोठा व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. परंतु काही महिन्यांनी त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
पोलिसात गुन्हा दाखल होताच या प्रकरणी मुलीचे सासरे अनुज त्रिवेदी आणि प्रखर त्रिवेदीला अटक करण्यात आली आहे. भाजप आमदाराने मुलीचं लग्न अनेक लोकांच्या सल्ल्यानंतर ठरवल्याचे तक्रारी सांगितले आहे. लग्न ठरवताना लोकांनी प्रखर त्रिवेदी हा स्वभावाने चांगला असल्याचे सांगितले होते. परंतु लग्नाच्या दीड वर्षांनी प्रखरचं खरं रुप समोर आलं. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणींना फसवल्याचे समोर आलं आहे. त्याने वेगवेगळ्या राज्यात खोटी ओळख सांगून तरुणींशी लग्न करणे आणि त्यांची आर्थिक फसवणूक फरार होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. भाजप आमदाराच्या दाव्यानुसार, प्रखरने फसवून 25 तरुणींशी लग्न केलेत. आमदार ज्ञान तिवारी यांनी पुढे सांगितले की, ‘प्रखरविषयी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर मुलीला घरी आणलं. त्रिवेदी कुटुंबाशी सर्व नाते संपवल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे तिवारी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसेच या प्रकाराने त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा देखील मलीन झाली आहे.