‘एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर..’ राहुल गांधी यांना ज्योतिरादित्य शिंदेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Mar 09, 2021 | 5:26 PM

राहुल गांधींच्या या वक्तव्याला आता पूर्वाश्रमीचे राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि आताचे भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर.. राहुल गांधी यांना ज्योतिरादित्य शिंदेंचं प्रत्युत्तर
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर आता मुख्यमंत्री दिसले असते. पण सध्या ते भाजपमध्ये बॅक बेंचर बनले’ असल्याचा टोला लगावला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्याला आता पूर्वाश्रमीचे राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि आताचे भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकारण आता पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे.(BJP MP Jyotiraditya Shinde’s reply to former Congress president Rahul Gandhi)

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ज्योतिरादित्य शिंदे यांना विचारला असता, ‘राहुल गांधी यांना आता जेवढी काळजी आहे, तेवढी त्यांनी त्यावेळी करायला हवी होती जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. या पेक्षा अधिक मला काही बोलण्याची गरज वाटत नाही, असं शिंदे यांनी म्हटलंय.

भाजप प्रदेशाध्यक्षांचाही राहुल गांधींना टोला

मध्य प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनीही राहुल गांधी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मुद्द्यावरुन टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांची काळजी करावी. ते ही शिंदे यांचे मित्र आहेत. सर्वकाही गमावल्यानंतर राहुल गांधी याबाबत बोलत आहेत. आधी शिंदे यांना सन्मानाची वागणूक दिली नाही’, असं प्रत्युत्तर शर्मा यांनी दिलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

ज्योतिरादित्य शिंदे आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, पण आता ते भाजपात बॅक बेंचर बनले, असा टोला काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शिंदे यांना लगावला आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी इंडियन यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संघटन कौशल्याचं कौतुकही केलं. पण शिंदे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खंतही व्यक्त केली.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करण्याचा आणि संघटना मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी आपला मार्ग निवडला, अशा शब्दात राहुल गांधी यांनी शिंदेच्या भाजपमध्ये जाण्यावर खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शिंदे आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, जर ते काँग्रेसमध्ये असते. पण आता ते भाजपात पिछाडीवर गेले असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदेंना अप्रत्यक्षपणे घरवापसीचं आवाहन?

शिंदे भाजपमध्ये कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना परत आपल्याकडेच यावे लागेल, असं सांगत राहुल गांधी यांनी जणू शिंदे यांना घरवापसीचं आमंत्रणच दिले आहे. RSSच्या विचारधारेविरोधात लढा आणि कुणालाही घाबरू नका, अशा शब्दात राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

2020 मध्ये नेमकं काय घडलं?

काँग्रेसमध्ये 18 वर्षे राजकीय प्रवास करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गोटातील 20 पेक्षा अधिक आमदारही काँग्रेसमधून बाहेर पडले. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपचे शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर ज्योतिरादित्य शिंदे यांना जूनमध्ये भाजपनं राज्यसभेवर पाठवलं.

संबंधित बातम्या :

राहुल गांधी माफी मागता-मागता थकतील, पण त्यांच्या गुन्ह्यांची गणती संपणार नाही- मुख्तार अब्बास नक्वी

मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय, सरकार संकटात

BJP MP Jyotiraditya Shinde’s reply to former Congress president Rahul Gandhi