ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, आता भाजपात बॅक बेंचर – राहुल गांधी

राहुल गांधी यांनी सोमवारी इंडियन यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संघटन कौशल्याचं कौतुकही केलं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:53 PM, 8 Mar 2021
ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, आता भाजपात बॅक बेंचर - राहुल गांधी

नवी दिल्ली : ज्योतिरादित्य शिंदे आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, पण आता ते भाजपात बॅक बेंचर बनले, असा टोला काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शिंदे यांना लगावला आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी इंडियन यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संघटन कौशल्याचं कौतुकही केलं. पण शिंदे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खंतही व्यक्त केली.(Rahul Gandhi indirectly invites Jyotiraditya Shinde to return to Congress)

ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करण्याचा आणि संघटना मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी आपला मार्ग निवडला, अशा शब्दात राहुल गांधी यांनी शिंदेच्या भाजपमध्ये जाण्यावर खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर शिंदे आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, जर ते काँग्रेसमध्ये असते. पण आता ते भाजपात पिछाडीवर गेले असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदेंना अप्रत्यक्षपणे घरवापसीचं आवाहन?

शिंदे भाजपमध्ये कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना परत आपल्याकडेच यावे लागेल, असं सांगत राहुल गांधी यांनी जणू शिंदे यांना घरवापसीचं आमंत्रणच दिले आहे. RSSच्या विचारधारेविरोधात लढा आणि कुणालाही घाबरू नका, अशा शब्दात राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसमध्ये 18 वर्षे राजकीय प्रवास करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गोटातील 20 पेक्षा अधिक आमदारही काँग्रेसमधून बाहेर पडले. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपचे शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर ज्योतिरादित्य शिंदे यांना जूनमध्ये भाजपनं राज्यसभेवर पाठवलं.

राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एका ट्वीटमध्ये हिंदीमधील काही खास म्हणींचा वापर करुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकार कशाप्रकारे तपास यंत्रणा आणि देशातील जनतेला वेठीस धरत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी आयकर विभाग (Income Tax Department), सक्तवसुली संचालनालय (enforcement directorate) आणि केंद्रीय तपास यंत्रणा (central bureau of investigation) याबाबत ‘उंगलियों पर नचाना’ या म्हणीचा वापर करत केंद्र सरकार या तिन विभागांना आपल्या बोटांवर नाचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. काँग्रेसच्या काळातही असे आरोप अनेकदा झाले होते.

संबंधित बातम्या :

मध्य प्रदेशात काँग्रेसला हादरा, ज्योतिरादित्य शिंदेंचा राजीनामा, वडिलांच्या जयंतीलाच वादळी निर्णय, सरकार संकटात

राहुल गांधी माफी मागता-मागता थकतील, पण त्यांच्या गुन्ह्यांची गणती संपणार नाही- मुख्तार अब्बास नक्वी

Rahul Gandhi indirectly invites Jyotiraditya Shinde to return to Congress