पंडित नेहरू रंगेल… चर्चा नीटवर पण गोंधळ पहिल्या पंतप्रधानांवरून, निशिकांत दुबे यांची जीभ घसरली, वक्तव्याने संसदेत वादळ

Nishikant Dubey on Jawaharlal Nehru: संसदेत कालपासून NEET-UG च्या चर्चेवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नीटऐवजी दुसरा विषय समोर येत असल्याने संसदेत मोठा गोंधळ उडाला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून संसदेत वादळ उठले.

पंडित नेहरू रंगेल... चर्चा नीटवर पण गोंधळ पहिल्या पंतप्रधानांवरून, निशिकांत दुबे यांची जीभ घसरली, वक्तव्याने संसदेत वादळ
पंडित जवाहरलाल नेहरू, निशिकांत दुबे
| Updated on: Jul 29, 2026 | 11:49 AM

लोकसभेत मंगळवारी NEET पेपरफुटी आणि अँटी पेपर लिक बिलवर जोरदार चर्चा झाली. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर हल्ला चढवला. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत दिलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले. पंडित नेहरू यांच्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली. काँग्रेसकडून भाजपवर पेपर लीक प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपने नेहरू यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा आधार घेत वादग्रस्त वक्तव्य केले. यापूर्वी सुद्धा दुबे यांनी असाच आरोप केला होता. त्यांचं विधान कामकाजातून काढलं की नाही हे समोर आलेले नाही. पण मीडियाशी बोलताना आपण आपल्या विधानावर ठाम आहोत आणि गरज पडल्यास आपण या दाव्याची सत्यताही समोर आणू शकतो, असं निशिकांत दुबे म्हणाले.

आणि गोंधळाला सुरूवात

केरळम या राज्यातील वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी नवीन शिक्षणमंत्री प्रह्लाद जोशी यांच्यावर एक वक्तव्य केले. त्याचा संघाशी संबंध होता. त्यावरून एकच हंगामा सुरू झाला. त्याचवेळी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. दुबे यांच्या वक्तव्याला त्यांनी कशाचा आधार घेतला असा सवाल काँग्रेसने केला.

एडविना माऊंटबॅटनच्या पुस्तकाचा आधार

त्यावर खासदार निशिकांत दुबे यांनी पलटवार केला. “मी एडविना माऊंटबॅटन यांचे पुस्तक, नेहरू यांचे सचिव मथाई यांचे पुस्तक आणि पद्मजा नायडू यांच्या पत्राच्या अनुषंगाने जे लिहिलेले आहे, त्यावरून ते वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. नेहरू आणि गांधी यांनी या पुस्तकाला विरोध केला नाही. त्यावर बंदीची मागणी केली नाही, तर मग मला का थांबवता? मी पुस्तकातील दावा करत आहे.” असे दुबे म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा

त्यापूर्वी खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला. परदेशी शक्तींच्या तालावर ते कठपुतळीसारखे नाचत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत एक प्रस्ताव आणण्याचा दावाही त्यांनी केला. दुबे हे झारखंडमधील गोड्डा येथून लोकसभेत निवडून आलेले आहेत. 2004 ते 2026 या कालावधीत राहुल गांधी यांची परदेश यात्रा, त्यांचे सहकारी आणि त्यांच्या योजनांविषयी विशेष चौकशी समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आज या मुद्यावरून दुपारी पुन्हा वादाची शक्यता आहे.  लोकसभा अध्यक्षांनी दुपारपर्यंत कामकाज तहकूब केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us