
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात निरंजनी अखाडाचे महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी जी महाराज यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याची आणि नेतृत्वाची गरज आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या घटनेत बदल केला पाहिजे. भाजपने नेत्यांच्या निवृत्तीचे वय 75 वरुन वाढवून 85 वर्ष केले पाहिजे, असे कैलाशानंद गिरी जी महाराज यांनी म्हटले आहे.
महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी जी जमुई जिल्ह्यातील सिमुलतला येथील आश्रमात पोहचले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी जवळून ओळखतो. ते थकतही नाही, झोपतही नाही. देशासाठी संपूर्ण निष्ठेने काम करतात. त्यांना देशसेवा करण्याची आणखी संधी दिली पाहिजे. पीएम नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे.
महामंडलेश्वर यांनी नेपाळमध्ये चीनचा वाढत असलेल्या प्रभावावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, भारताने नेपाळच्या संरक्षणासाठी पाऊले उचलली पाहिजे. मी 12 दिवसांचा नेपाळ प्रवास करुन आता परत आलो आहे. त्या ठिकाणी 85 टक्के हिन्दू आहेत. नेपाळ एक ‘हिंदू राष्ट्र’ आहे. भारताने नेपाळचे संरक्षण केले पाहिजे. त्या ठिकाणी चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे. नेपाळ आमचा लहान भाऊ आहे. तो आमचापासून वेगळा झाला तर आमचे खूप नुकसान होईल. त्यामुळे नेपाळला चीनच्या प्रभावापासून वाचवले पाहिजे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे बंद केले नाही तर पाकिस्तानवर पुन्हा मोठी कारवाई केली पाहिजे. भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगभरातील देशांचे ऐकून पाकिस्तानवर दया दाखवली. पण तो देश दया करण्याचा लाईकीचा नाही.
कैलाशानंद गिरी यांनी म्हटले, भारत सनातनांचा देश आहे. यामुळे भारताला हिंदू राष्ट्र जाहीर केले पाहिजे. जो भारतात राहतो त्याला ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागणार आहे. भगवा ध्वजास नाही पण राष्ट्रध्वजास तुम्हाला नमन करावेच लागणार आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला ‘वंदे भारत’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणावे लागणार आहे.