मुस्लीम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा, भाजप नेत्याचे हिंदूंना चिथावणीखोर आवाहन

उत्तर प्रदेशमधील भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी हिंदूंनी मुस्लीम महिलांवर बलात्कार करावे, असे बेताल वक्तव्य केले आहे.

मुस्लीम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा, भाजप नेत्याचे हिंदूंना चिथावणीखोर आवाहन

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या सुनिता सिंह गौड यांनी हिंदूंनी मुस्लीम महिलांवर बलात्कार करावे, असे बेताल वक्तव्य केले आहे. रामकोला येथील या भाजप पदाधिकाऱ्याने हे विधान केल्यानंतर देशभरात याचे पडसाद उमटत आहेत.

गौड यांनी फेसबुकवरील एका पोस्टवर कमेंट करत लिहिले होते, “यावर एकच उपाय आहे. 10 हिंदू भावांनी एकत्रितपणे मुस्लीमांच्या बहिण आणि आईवर सार्वजनिकपणे रस्त्यावर बलात्कार करावा. त्यानंतर त्यांना कापून बाजाराच्या मधोमध खांबाला लटकवा. दगडाचे उत्तर दगडानेच द्यावे लागेल.”

पत्रकार दिपाली त्रिवेदी यांनी यावर आक्षेप घेत अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण प्रतिक्रियेचा निषेध केला. तसेच अशा विकृत विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सत्तेचा उपयोग होत असल्याचाही आरोप केला. यावर बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील तीव्र प्रतिक्रिया दिली. स्वरा म्हणाली, “ही बातमी खरी वाटते. कारण संबंधित महिलेने फेसबुकवर आपली सेटिंग बदलली आहे. त्यामुळे ही प्रतिक्रिया सार्वजनिकपणे पाहता येत नाही. ही महिला स्वतःला भाजपच्या महिला मोर्चाचा अध्यक्ष म्हणवत आहे, मात्र, महिलांवरच सामुहिक बलात्काराची भाषा करत आहे.” स्वराने आपल्या ट्विटमध्ये फेसबुकलाही टॅग करत संबंधित महिला सार्वजनिकपणे बलात्कारासाठी चिथावणी देत असल्याचे लक्षात आणून दिले.

स्वराच्या या ट्विटवर भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी उत्तर देताना संबंधित महिला भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष नसल्याचा युक्तीवाद केला. तसेच स्वरा भास्करवरच अफवा पसवत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “ती महिला भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष आहे हा फक्त तुमचा दावा आहे. त्या पदावर सध्या मी आहे. भाजपवर किंवा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष पदावर टीका करण्याआधी तथ्य तपासून घ्या. यामुळे अफवा पसरवण्याच्या तुमच्या सवयीला आळा बसेल, अशी आशा आहे.”

पत्रकार त्रिवेदी यांच्या ट्विटला उत्तर देताना रहाटकर यांनी त्या पदाधिकाऱ्याला निलंबित केल्याचे सांगितले. रहाटकर म्हणाल्या, “अशी कोणतीही घृणास्पद प्रतिक्रिया सहन केली जाणार नाही. सुनिता सिंह गौड यांना निलंबित करण्यात आले आहे.” रहाटकर यांनी आपल्या ट्विटसोबत त्यासंबंधित पत्राचाही फोटो टाकला. याप्रमाणे गौड यांना 27 जूनला पदावरुन हटवण्यात आले.

भाजप नेत्या सुनिता सिंह गौड यांनी मुस्लीम महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी सोशल मीडियावर भडकावल्यानंतर सर्वच स्तरातून याचा निषेध होत आहे. याचे पडसाद अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेतही उमटले आहेत. गौड यांची ही प्रतिक्रिया फेसबुकवरुन हटवण्यात आली आहे. मात्र, या प्रतिक्रियेचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *