
कोलकाता | 26 सप्टेंबर 2023 : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं आपण नेहमी म्हणतो. काळ जरी आला नसला तरी ती वेळ येऊ न देण्यास कोणी ना कोणी तरी कारणीभूत असतो. त्यामुळे प्राण वाचतात. मोठा अनर्थ टळतो. पश्चिम बंगालमध्येही असाच मोठा अनर्थ टळला आहे. एक्सप्रेसमधून जाणाऱ्या शेकडो प्रवाशांचा त्या दिवशी काळ आला होता. पण एका 12 वर्षाच्या मुलाने वेळ येऊ दिली नाही. त्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नाही तर प्रेतांच्या राशीच पडल्या असत्या आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असता.
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात हा प्रकार घडला. एका 12 वर्षाच्या मुलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. येथील रेल्वे ट्रॅक डॅमेज झालेला होता. त्यामुळे मोठा अपघात झाला असता आणि शेकडो प्रवासी दगावले असते. पण मुरसलीन शेख या 12 वर्षीय मुलाने हा ट्रॅक पाहिला आणि त्याला धोक्याचा अंदाज आला. त्याने अंगातील लाल शर्ट काढलं आणि ट्रॅकवर उभा राहून त्याने समोरून येणाऱ्या एक्सप्रेसला लाल शर्ट दाखवलं. लोको पायलटने याचा सिग्नल पकडला. आणि योग्य ठिकाणी ट्रेन रोखण्यासाठी एमर्जन्सी ब्रेक लावला. गुरुवारी भालुका रोड यार्ड येथे ही घटना घडली.
नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांनी या बाबातची माहिती दिली. या मुलाने ट्रेन रोखण्यासाठी लाल शर्ट दाखवला. त्यामुळे लोको पायलटने एमर्जन्सी ब्रेक लगावला आणि योग्य वेळी ट्रेन थांबली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक डॅमेज झाली होती. हे या मुलाने पाहिलं आणि त्यामुळे त्याने रेल्वेला लाल शर्टचा सिग्नल दाखवला, असं सब्यसाची यांनी सांगितलं.
रेल्वे ट्रॅकच्या जागेवरील पोरियन क्षतिग्रस्त झाला होता. त्याखालील माती आणि खडी पावसामुळे वाहून गेली होती. मुरसलीन शेख हा एका प्रवाशी मजुराचा मुलगा आहे. तो रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत यार्डात उपस्थित होता. त्याला पटरीच्या खालील माती आणि खडी वाहून गेल्याचं लक्षात आलं. तसेच रेल्वे ट्रॅक डॅमेज झाल्याचंही त्याने पाहिलं. त्यामुळे त्याने सतर्क होऊन लगेच समोरून येणारी ट्रेन लाल शर्ट दाखवून थांबवली. त्याच्यासोबत इतर मजुरांनीही लाल पकडा दाखवून ट्रेन थांबवली.
दरम्यान, या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. तसेच या मुलाच्या सतर्कतेबद्दल त्याला शौर्य पुरस्कार आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं आहे. त्याला प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. या मुलाच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करण्यात आला.