Bread Biscuit Price Hike : खायचं काय? गव्हाच्या पिठापाठोपाठ ब्रेड आणि बिस्किटही महागलं; वाचा किती भाव वाढलाय?

| Updated on: May 09, 2022 | 5:57 PM

किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) 20 टक्के अधिक भावाने गव्हाची विक्री सुरू आहे. गव्हाच्या भाववाढीचा थेट परिणाम गव्हापासून निर्मित वस्तूंवर होणार आहे. ब्रेड, बिस्किट तसेच गव्हापासून निर्मित बेकरी उत्पादने महागणार आहेत.

Bread Biscuit Price Hike : खायचं काय? गव्हाच्या पिठापाठोपाठ ब्रेड आणि बिस्किटही महागलं; वाचा किती भाव वाढलाय?
खायचं काय? गव्हाच्या पिठापाठोपाठ ब्रेड आणि बिस्किटही महागलं; वाचा किती भाव वाढलाय?
Image Credit source: pexels.com
Follow us on

नवी दिल्लीसर्वसामान्य जनतेला महागाईच्या (Inflation rate) तीव्र झळा सहन कराव्या लागत आहे. इंधन, गॅस सिलिंडर, घरगुती वापराच्या वस्तूंच्या भाववाढीसोबत गव्हाचे पदार्थ महागण्याची शक्यता आहे. गव्हाच्या भावात उच्चांकी 46 टक्क्यांची भाववाढ नोंदविली गेली आहे. किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) 20 टक्के अधिक भावाने गव्हाची विक्री सुरू आहे. गव्हाच्या भाववाढीचा थेट परिणाम गव्हापासून निर्मित वस्तूंवर होणार आहे. ब्रेड, बिस्किट तसेच गव्हापासून निर्मित बेकरी उत्पादने महागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसण्याची दाट शक्यता आहे. देशातील गव्हाच्या किंमती गेल्या 12 वर्षांत दुप्पट झाल्या आहेत. जानेवारी 2010 मध्ये गव्हाच्या पिठाच्या किंमती (Wheat Flour-aata) प्रति किलो 17 ते 18 रुपये होत्या. या एप्रिल महिन्यात किंमती प्रति किलो तब्बल 32.38 रुपयांवर पोहचल्या आहेत.

1 वर्ष, 9.15% भाववाढ

केंद्रिय ग्राहक कल्याण, अन्नधान्य आणि पुरवठा विभागानेच देशातील गव्हाच्या दराचा आढावा घेतला आहे. शनिवारी गव्हाच्या पिठाचे भाव 32.78 रुपये प्रति किलो वर पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत समान कालावधीत 30.03 रुपये प्रति किलो या भावापेक्षा 9.15 टक्क्यांनी जास्त असल्याचे खात्याने स्पष्ट केले. पोर्ट ब्लेअर येथे सर्वाधिक जास्त 59 रुपये प्रति किलो तर पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे सर्वात निच्चांकी 22 रुपये प्रति किलो भावाने गव्हाचे पीठ विक्री केली जात आहे.

मुंबईत उच्चांकी भाव-

देशातील चार प्रमुख शहरात गव्हाच्या पिठाचे दर कमी जास्त आहेत. त्यात सर्वाधिक किंमत आहे ती मुंबई शहरात. मुंबईत गव्हाच्या पिठाचे भाव प्रति किलो 49 रुपये इतके आहे. तर त्याखालोखाल चेन्नईत 34 रुपये प्रति किलो भाव तर कोलकत्तामध्ये गव्हाच्या पिठासाठी प्रति किलो 29 रुपये आणि दिल्लीत सर्वात कमी 27 रुपये प्रति किलो दर आहेत.

हे सुद्धा वाचा

युद्धामुळे भाव गगनाला-

गव्हाच्या पिठाच्या दरात 1 जानेवारीपासून आतापर्यंत 5.81 टक्के दरवृद्धी झाली आहे. यामध्ये उच्चांकी पातळी एप्रिल महिन्यात गाठण्यात आली. एप्रिल महिन्यात गव्हाच्या पिठाचे दर सर्वात उच्चांकी पातळीवर गेल्याचे दोन वर्षात समोर येत आहे. सर्वच क्षेत्रातील महागाईसाठी रशिया-युक्रेन युद्धाला कारणीभूत ठरविण्यात येत आहे. गव्हाच्या पिठाचे दर वाढीचे खापर ही या दोन देशाच्या संघर्षावर फोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे या युद्धामुळे डिझेलचे दर वाढले असून वाहतूक खर्चात झालेली वाढ गव्हाच्या किंमतीवर आणि पिठाच्या किंमतीवर झाला आहे. त्याचा भार सहाजिकच सर्वसामान्यांच्या खिशावर पडत असल्याने चिंता वाढली आहे.