
कोलकाता- पायात हवाई म्हणजेच रबरी चप्पल, साधारण चुरगळलेली साडी, जेव्हाही ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांचे नाव घेतले जाते, त्यांची हीच प्रतिमा सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभी राहते. ममता अनेकदा खासदार झाल्या पण त्यांनी कधीही त्या पदाचे पेन्शन (pension) घेतलेले नाही. तृणमूलच्या सर्वेसर्वा असलेल्या ममतादीदी मुख्यमंत्री (Chief Minister)झाल्यानंतरही त्यांनी कधी पगार घेतलेला नाही. त्यांची गुजराण ही त्यांच्या पुस्तकांवर, गाण्यांवर आमि पेंटिंगमधून मिळणाऱ्या पैशांतून होते. थोडक्यात साधेपणा हीच ममता दीदींची ओळख आहे. मात्र प. बंगालच्या स्कूल सेवा आयोगाच्या भरती घोटाळ्यात नाव आल्याने मंत्री पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. भ्रष्टाचाराचे मळभ तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या मंत्र्यावर आलेले असताना, ममतादीदी त्यांच्या या साधेपणामुळे त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतील का, हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झालेली असताना, मुख्यमंत्री म्हणून त्या जबाबदारीतून पळू शकतील का, हा खरा प्रश्न आहे.
पक्षाच्या पातळीवर पार्थ चॅटर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आल्यानंतर, त्यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ममतादीदींनी त्यांना सगळ्या मंत्रिपदावरुन हटवले. या प्रकरणात पार्थ यांच्यावर कारवाईसाठी उशीर झाला, यावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशा स्थितीत केवळ ममता बॅनर्जी यांची साधी प्रतिमा सरकारला तारु शकेल का, असा प्रश्न आहे.
2004 साली पंतप्रधानपद सोनिया गांधींनी, डॉ. मनमोहन सिंग यांना दिले, याचा परिणाम झालाच. त्यांनी मोठा त्याग केला, असा संदेश त्यातून गेला. 2009 साली त्याचा फायदा काँग्रेसला झाला. ममता यांचा पेन्शन न घेण्याचा निर्णय एक आदर्श आहे. आपल्या देशात वैयक्तिक नेत्याच्या कामगिरीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही असेच पाहिले जाते. त्यामुळे ममता आणि पक्षाच्या प्रतिमेवर फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र यात प्रशासनाचा दर्जा घसरता कामा नये याकडे ममतांनी लक्ष देण्याची गरज
आहे. अखिलेश यादव हे भ्रष्ट नव्हते, पण त्यांच्या आजूबाजूला भ्रष्ट नेतेमंडळी होती. मुलायम सिंह यांनी त्यांचा बचाव केला. यातून अखिलेश यादव य़ांच्या प्रतिमेवर परिणाम झाला. प. बंगालचा विचार केला तर जनतेच्या मनात पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ममतांनी तातडीने मोठी कारवाई करायला हवी. असे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
ममता त्यांच्या साधेपणाबाबत सतर्क असल्या तरी त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींवर त्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसते आहे. ही धोकादायक स्थिती आहे. भ्रष्टाचाराला सहन केले जाणार नाही, हा संदेश देणे गरजेचा असल्यान ममता बॅनर्जी यांना पार्थ चॅटर्जी यांच्या हकालपट्टीचा निर्णय करावा लागला.
पार्थ चॅटर्जी हे ममता यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री आहेत. शिक्षकांच्या भरती प्रकरणात घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2014 ते 2021 या काळात त्यांच्याकडे शिक्षणमंत्री पद होते. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीने 23 जुलै रोजी पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत नीकटवर्तीय आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिलाही अटक करण्यात आली आहे. अर्पिताच्या दोन फ्लॅट्समधून 50 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पार्थ यांचा त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी स्वतंत्र एसी फ्लॅट असल्याचीही माहिती आहे. ही संपत्ती आली कुठून, असा प्रश्न कोर्टानेही विचारला होता. पार्थ यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी इंटरनॅशनल स्कूल निर्माण केले आहे. यासाठी 85 कोटीत त्यांनी 27 बिघा जमीन खरेदी केली होती. शाळेच्या निर्मितीचा खर्च वेगळा आहे.