
धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्या छांगूर बाबा आणि त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन एटीएसच्या रिमांडमध्ये आहेत. त्यांच्या चौकशीत एटीएसला धक्कादायक माहिती मिळाली आहे. छांगूर बाबाला केवळ दुबई आणि सौदी अरेबियातून नाही तर पाकिस्तान आणि तुर्की येथून कोट्यवधी रुपये पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे. ही रक्कम नेपाळच्या एजंटच्या माध्यमातून भारतात पोहचवण्यात आली.
छांगूर बाबाला मिळालेली रक्कम परकीय चलनात होती. बलरामपूर, श्रावस्ती आणि बहराइच येथील मनी एक्सचेंज सेंटरमध्ये ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली जात होती. यासाठी एजंटना पाच ते सात टक्के कमिशनही दिले जात होते. रिमांडमध्ये नसरीन हिने काही एजंटचे नावेही सांगितले. अनेक वेळा एटीएमवर लावण्यात आलेल्या कॅश डिपाझिट मशीनमधून रक्कम डिपॉझिट केली गेली आहे. नसरीनने पहिल्या दिवशी मांडलेल्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला की, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांव्यतिरिक्त, बिहारमधील अनेक भागात तिचे एजंट आहेत. हे लोक तिच्या टोळीचे नेटवर्क वाढविण्यात सतत गुंतलेले आहेत. बिहारमधील मधुबनी, सीतामढी, पूर्णिया, किशनगंज, चंपारण आणि सुपौल जिल्ह्यात एजंट सक्रीय असल्याचे नसरीन हिने एटीएसला सांगितले.
परदेशातून येणाऱ्या फंडिंगमधील मोठी रक्कम अयोध्येत पाठवण्यात आली. त्या ठिकाणी अनेक जणांचे धर्मांतर करण्यात आले. त्यात अनेक मुलींचा समावेश होता. हे फंडीग छांगूरबाबा आणि त्याच्या नेटवर्कमधील सहकारी देत होते. एटीएस अधिकाऱ्याने म्हटले की, नसरीन हिने दिलेल्या या जबाबातील सत्यता तपासण्यात येणार आहे.
एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नसरीनच्या सहा खात्यात ३४ कोटी रुपये जमा झाले. ही बँक खाते गोठवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसह शारजा, दुबई आणि इतर देशांमध्येही छांगूर बाबाच्या सहकाऱ्यांची खाती असण्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. छांगूरबाबरचे नेटवर्क हवाला प्रकरणात सक्रीय असल्याचा दावा एटीएसकडून केला जात आहे.