
जयपूर : अर्थसंकल्प हा राज्याचा खर्चाचा वार्षिक आराखडा असतो. लोकप्रतिनिधींच्या सभागृहात तो सादर करुन मंजूर करावा लागतो. या अर्थसंकल्पासाठी अनेक महिने काम चालत असते. अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अनेक बंधने असतात. त्यांना घरी जाता येत नाही, फोन वापरता येत नाही. परंतु देशाच्या इतिहासात प्रथमच आगळावेगळा प्रकार झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावरुन सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधानसभेत जुना अर्थसंकल्प आठ मिनिटे वाचून काढला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
पेपर लीक के बाद अब राजस्थान का बजट भी लीक!
गहलोत जी एक कॉपी तो अपने पास भी रखते, पुराना नहीं पढ़ना पड़ता।#RajasthanBudget pic.twitter.com/93IPR1PisB
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) February 10, 2023
जुन्या योजनांचा उल्लेख
मुख्यमंत्री गेहलोत विधानसभेत अर्थसंकल्प वाचत असताना विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरू केला. परंतु अशोक गेहलोत अर्थसंकल्प वाचत होते, तेव्हा त्यांनी मागील वर्षांच्या तीन ते चार योजना वाचून दाखवल्या. त्यात मागील वर्षी राबविण्यात आलेली शहर विकास योजनाही होती. त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काही सांगितले. यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू केला. अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले.
नेमके काय झाले
अशोक गहलोत अर्थसंकल्प वाचताना इंदिरा गांधी शहरी रोजगार गॅरंटी योजनेची घोषणा केली. या योजनेत शहरात राहणाऱ्या लोकांना 100 दिवस रोजगार देण्याची गॅरंटी देण्यात आली आहे. या योजनेवर दरवर्षी 800 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यावेळी महेश जोशी यांनी त्यांना थांबवले. कारण ही योजना मागील वर्षी अर्थसंकल्पात सादर केली होती.
काय म्हणाले गेहलोत
जुना अर्थसंकल्प वाचल्याबद्दल अशोक गेहलोत यांनी सांगितले की, प्रिटींग प्रेसमध्ये हा अर्थसंकल्प मी छापला नाही. त्यात एक पान चुकीचे लागले. 7-7 दिवस अर्थसंकल्प तयार करणारे कर्मचारी झोपले सुद्धा नाही. माझ्याकडे सकाळी 6 वाजता अर्थसंकल्पाची कॉपी आली.
दरम्यान जुना अर्थसंकल्प वाचल्याबद्दल अशोक गेहलोत यांनी माफीसुद्धा मागितली. तब्बल 8 मिनिटे ते मागील वर्षाचा अर्थसंकल्प वाचत होते. भाजप सदस्य वेलमध्ये घोषणाबाजी करत होते.
केंद्रीय मंत्र्यांची टीका
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यासंदर्भात ट्वीट केले. त्यात राजस्थान सरकावर उपरोधिकपणे टीका करण्यात आली. त्यांनी म्हटले की, पेपर लीक के बाद अब राजस्थान का बजट भी लीक! गहलोत जी एक कॉपी तो अपने पास भी रखते, पुराना नहीं पढ़ना पड़ता.
विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, जे काही घडले ते दुर्दैवी आहे. आजच्या घटनेने आम्हाला दु:ख झाले. मानवी चुका होत राहतात. ही संपूर्ण कार्यवाही कामकाजातून वगळण्यात येत आहे.