
Chinnaswamy Stadium Stampede : बंगळुरू शहरातील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आयपीएल 2025 हंगामाची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूच्या संपूर्ण संघाच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला आल्याने येथे मोठी चेंगराचेंगरी झाली. एकीकडे स्टेडियमच्या आवाराच्या बाहेर मोठी चेंगराचेंगरी झालेली असताना दुसरीकडे मात्र बंगळुरू संघाच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या थाटात घेण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विराट कोहलीने हसत-हसत छोटेखानी भाषण केले.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले. चिन्नास्वामी स्टेडियमची आसनक्षमता ही फक्त 40 हजारांची आहे. मात्र या कार्यक्रमाला तब्बल 5 लाख लोक आले होते. यातील बहुतांश चाहते हे तरुण होते. याच कारणामुळे गर्दी अनियंत्रित झाली. यातच पोलिसांनीही गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यामुळे गर्दी जास्तच अनियंत्रित झाली. यामुळे बघता-बघता स्टेडियम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण यात जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे हे चेंगराचेंगरीचे वृत्त देशभरात पसरले होते. तर दुसरीकडे मात्र स्टेडियममध्ये बंगळुरू संघाच्या सत्काराचा कार्यक्रम मात्र मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमात बंगळुरू संघाच्या सर्वच खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. या संघाचा स्टार फलंदाज विराटक कोहली यानेदेखील या प्रसंगी छोटेखानी भाषण केले. हसत-हसत त्याने सगळ्यांचे आभार मानले. विराटच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो नेमकं काय म्हणतोय हे स्पष्टपणे दिसत नाहीये. मात्र तो हसत हसत आयोजकांनी केलेल्या स्वागताबद्दल आभार मानताना दिसतोय.
दरम्यान, आता या दुर्घटनेनंतर कार्यक्रमाच्या आयोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एवढी घाई का केली? असा सवाल उपस्थित केला जातोय. तसेच हा कार्यक्रम आयोजित करताना नियोजन करण्यात आले नव्हते असाही आरोप विरोधकांनी केला आहे.