सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापूर्वी भूषण गवई यांनी कोणाच्या पायांना केला स्पर्श?

अमरावतीचे भूषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश बनले आहेत. त्यांनी आज (बुधवार) राष्ट्रपती भवनात सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी इतर मान्यवरांनाही अभिवादन केलं. शपथविधीदरम्यान पहिल्या रांगेत बसलेल्या एका महिलेचा त्यांनी आशीर्वाद घेतला.

सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापूर्वी भूषण गवई यांनी कोणाच्या पायांना केला स्पर्श?
सरन्यायाधीश बी. आर. गवई
Image Credit source: ANI
| Updated on: May 14, 2025 | 12:29 PM

न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. आज (बुधवार) राष्ट्रपती भवनात हा शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी बी. आर. गवई यांनी असं काही केलं, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. शपथ घेण्यापूर्वी ते आधी पुढच्या रांगेत बसलेल्या सर्व मान्यवरांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रामनाथ कोविंद, संजीव खन्ना, जगदीप धनखड यांच्या अनेकांना त्यांनी अभिवादन केलं. त्याच रांगेत पुढे असलेल्या एका महिलेच्या पायांना त्यांनी स्पर्श केला. त्या कोण आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की न्या. बी. आर. गवई हे शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात आले. शपथ घेण्यापूर्वी ते पुढच्या रांगेत बसलेल्या मान्यवरांना भेटायला गेले. याच पंक्तीत त्यांचे कुटुंबीयही बसलेले होते. सर्वांना हस्तांदोलन करत ते पुढे जात होते. त्याच रांगेत एक महिला उभ्या होत्या. त्यांच्यापर्यंत आल्यानंतर गवई यांनी आधी हात जोडले आणि त्यानंतर त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यांनीही भूषण गवई यांना आशीर्वाद दिला. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून सरन्यायाधीश बी. आर. गवई यांची आई आहे. कमलताई गवई असं त्यांचं नाव आहे.

आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश बनले आहेत. त्यांच्याआधी संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. न्या. गवई यांचा प्रवास अमरावतीतून सुरू झाला. पुढे ते नागपूरमार्गे दिल्लीपर्यंत पोहोचले. अमरावतीचे सुपुरत्र सरन्यायाधीश झाल्याने अमरावतीत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा झाला. न्या. गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीत झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. भूषण हे तीन भावंडांपैकी ज्येष्ठ होते. वडील राजकारण, समाजकारणात सक्रिय असल्याने बालपणापासून त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला.