Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी इंडिया आघाडीकडून केली जात आहे.

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जोमात आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून हजारो आंदोलक दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर जमा झाले आहेत. सीजेपीतर्फे 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची काही देण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील घटकपक्षांनीही सरकारला धारेवर धरलंय. दोन्ही बाजूंच्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या मोदी सरकारवर दबाव वाढत आहे. असे असतानाचा आता 22 जुलै रोजी ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीचे खासदार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीच्या सर्वच खासदारांनी गांधी स्मृती भवनाकडे जात नीट पेपरविरोधात सरकारला घेरलं. पण त्याआधी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ झाला.
राहुल गांधींच्या निवासस्थापुढे काय घडले?
एकीकडे जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर राहुल गांधी यांच्यासह आघाडीच्या सर्वच खासदारांनी अगोदर राजघाटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु याला परवानगी मिळाली नाही. त्यानंतर राहुल गांधी यांनी गांधी स्मृती भवनात एकत्र येत नीट पेपर घोटाळ्याला विरोध आणि या घोटाळ्यामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृती भवनाकडे निघाले. परंतु राहुल गांधी यांच्या निवासस्थानीच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
राहुल गांधीच्या निवासस्थानापुढे बॅरिकेटिंग
गांधी स्मृती भवनाकडे जाण्यासाठी राहुल गांधी तसेच इतर खासदार बसमध्ये बसले होते. बस अवघी 10 मीटर अंतरावर गेली होती. खासदारांच्या बसपुढे एक पांढऱ्या रंगाची बस उभी करण्यात आली होती. तसेच अर्धसैनिक बल आणि रॅपीड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले. राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या बाहेरही बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. त्या भागात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. तेथील परिस्थिती लक्षात घेता राहुल गांधी यांनी गांधी स्मृती भवनात जाण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता राहुल गांधी आणि इतर खासदारांची बस ही गांधी स्मृती भवनात पोहोचली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
