CJP Jantar Mantar Protest: युट्यूबर ध्रुव राठी यांची सुटका, CJP आंदोलनात सहभागी झाल्यास आता मोठी अॅक्शन?
YouTuber Dhruv Rathee: युट्यूबर ध्रुव राठी याला पोलिसांनी काल ताब्यात घेतले होते.आज पोलिसांनी त्याची सुटका केली. पण त्याचवेळी CJP आंदोलनात सहभागी झाल्यास मोठ्या कारवाईचा इशारा सुद्धा दिला आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

YouTuber Dhruv Rathee: दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरूग्राम येथील घरातून युट्यूबर ध्रुव राठी याला ताब्यात घेण्यात आले होते. आता ताज्या अपडेटनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी याला पोलिसांनी सोडून दिले आहे.पण सुटकेनंतरही त्याच्यावर पोलिसांची करडी नजर असेल. त्याने सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला अथवा निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. आता ध्रुव हा ध्रुव ताऱ्याप्रमाणे आंदोलनात सहभागी होण्याच्या निर्णयावर ठाम राहतो, अढळ राहतो की आंदोलनातून माघार घेतो हे लवकरच समोर येईल.
काल पोलिसांनी घेतले होते ताब्यात
प्रसिद्ध युट्यूबर आणि जर्मनीत राहणारा ध्रुव राठी सीजेपी आंदोलनासाठी भारतात आला आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून सकाळी 8 वाजता ताब्यात घेतले होते. पोलिसांचे हे पथक शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांच्या घराबाहेर होते. सकाळी साध्या वेशातील 50 पोलिसांच्या पथकाने त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्याच्या आईने दरवाजा उघडला. पोलिसांनी आत प्रवेश करत त्याला ताब्यात घेतले. राठी याचे गुरुग्राममधील सेक्टर-46 मध्ये घर आहे. केंद्रीय विहार येथील घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांची ध्रुव राठीला तंबी
दरम्यान दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठी याच्या सुटकेची औपचारिकता पूर्ण केली. पण त्याचवेळी त्याला आज होणाऱ्या सीजेपीच्या कोणत्याही आंदोलनात, प्रदर्शनात सहभागी होता येणार नाही अशी तंबी पोलिसांनी त्याला दिली आहे. देशाच्या राजधानीत सध्या कलम 163 आणि सुरक्षेचे नियम लागू आहेत, याची जाणीव ध्रुवला अगोदरच करून देण्यात आली आहे. जर त्याने या नियमांचा भंग केला तर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.