सर्वात मोठा विजय… सर्व मान्य आहे… मंत्र्यांनीच येऊन सांगितलं; अखेर आंदोलन मागे
कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता CJP ने आंदोलन मागे घेतले आहे.

कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता CJP ने आंदोलन मागे घेतले आहे. CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी सरकारसोबत त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह हेही हजर होते.
मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा
दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणारे CJPचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्यांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या. यातील पहिली मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे. ते म्हणाले, ‘आज काही वेळापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आमची पहिली मागणी मान्य झाली आहे.’
आंदोलकांवरील FIR मागे घेतले जाणार
सौरव दास यांनी सांगितले की, ‘दुसरी मागणी आंदोलनकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेण्याची होती. सरकारने या मागणीवरही सहमती दर्शवली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप किंवा त्यांच्या आघाडीचे सरकार आहे, त्या राज्यांमध्ये विद्यार्थी आंदोलनकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेतले जातील आणि भविष्यातही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. तसेच कॉकरोच जनता पार्टीच्या टीममधील सदस्यांविरोधातही कोणतीही कारवाई केली जाणार नाही.’
आशुतोष रांका यांनी सांगितले की, सरकार मंगळवारपर्यंत आपली हमी लेखी स्वरूपात देणार आहे. तसेच आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या लोकांसाठी 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘सरकारने आमच्या सर्व प्रमुख मागण्या औपचारिकरित्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करत आहोत.’
काय म्हणाले मंत्री नड्डा?
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटले की, आंदोलकांनी सरकारकडे चार मुद्द्यांचा लेखी मसुदा सोपवला होता. यामध्ये सर्व राज्यांमध्ये दाखल करण्यात आलेले एफआयआर मागे घेणे, नियमांनुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई देणे आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या मागण्यांच्या सनदेचा अभ्यास करणे, तसेच त्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत पुढेही चर्चा सुरू ठेवण्याबाबत सहमती झाली आहे.