ना थ्री स्टार, ना फाइव्ह स्टार… या गावातील चहा दिला जातोय दिग्गजांना, पंतप्रधानांकडून तारीफ; काय आहे खासियत?
बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला येथील विदूर हर्बल टीने जगाचे लक्ष वेधले आहे. पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेला हा चहा सध्या BRICS परिषदेतील दिग्गजांना दिला जात आहे. महिला बचत गटांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता 12 कोटींच्या उलाढालीचा ग्लोबल ब्रँड बनला आहे.

Bijnor News : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला या छोट्या खेड्यातील खास चहाने सध्या जगाचं लक्ष वेधलं आहे. दिल्लीत ब्रीक्स परिषद (BRICS) सुरू आहे. या परिषदेला अर्ध्या जगातील दिग्गज नेते आले आहेत. या नेत्यांना बिजनौरमधील ही खास चहा दिली जात आहे. लखीवाला खेड्यातील महिलांनी ही विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी (Vidur Herbal Tea) तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अस्सल स्वदेशी चहाचं कौतुक केलं आहेच, पण या स्वदेशी ऑर्गेनिक हर्बल चहाचे जगातील दिग्गज नेत्यांनीही मुक्तकंठाने कौतुक केलं आहे. त्यामुळे थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेलातील चहाऐवजी या खेडे गावातील चहाची सध्या राजधानी दिल्लीत चर्चा सुरू झाली आहे.
केवळ 1 लाख रुपयांचे कर्ज काढून हा चहाचा उद्योग उभा राहिला होता. आज या उद्योगाची उलाढाल वर्षाला 12 कोटींची आहे. ही चहा आता केवळ एका खेड्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर हा एक ग्लोबल ब्रँड झाला आहे. दिल्लीत ब्रीक्स परिषद सुरू आहे. या परिषदेला जगभरातील पाहुणे आले आहेत. हे सर्व पाहुणे अति व्हिआयपी आहेत. त्यांनाही विदूर हर्बल टी दिली जात आहे.
या ऑर्गेनिक चहाची लोकप्रियता सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे फक्त देशातच नाही तर, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या विकसित देशातही याची फ्रेंचाइजी आणि आऊटलेट खोलण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीतील इंटरनॅशनल फू़ड फेस्टिव्हल आणि प्रयागराजच्या कुंभमेळ्यातही या चहाची आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भुरळ पडली होती.
लोकल ते ग्लोबल
राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनच्या अंतर्गत 2023मध्ये हा ब्रँड तयार झाला. बचत गटाच्या बबीता राणी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी एकत्र येऊन हर्बल टी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज बिझनौरमध्येही त्यांचे 35 हून अधिक आऊटलेट आहेत. तर मुरादाबासहित उत्तर प्रदेशातील अन्य प्रमुख शहरात या ब्रँडचं नेटवर्क वेगाने फैलावत आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर
शत प्रतिशत शुद्धता आणि आयुर्वेदिक गुण ही विदूर हर्बल टीची प्रमुख ओळख आहे. पूर्णपणे स्वदेशी आणि जडीबुटीचं मिश्रण असलेली ही चहा आहे. यात…
लेमन ग्रास आणि तुलसी: ताजगी आणि रोग प्रतिरोधक क्षमता (Immunity) वाढवण्यासाठी
गुळवेल आणि कच्ची हळद : शरीरला संक्रमण, सर्दी-पडसे आणि व्हायरलपासून वाचवण्यासाठी
ज्येष्ठमध आणि दालचीनी : गळ्याची खवखव दूर करणे आणि पाचन तंत्र सुधारण्यासाठी.
इलायची आणि बडीशेप : चांगली नैसर्गिक चव आणि सुगंधासाठी
मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी मन की बातमध्ये या चहाचं कौतुक केलं होतं. जेव्हा स्थानिक महिला एकत्र येतात, तेव्हा आपल्या ज्ञानाच्या बळावर प्रयत्नाने नवीन बदल घडवून आणत असतात. त्याचं हे द्योतक आहे, असं मोदी म्हणाले होते. मोदी यांनी कौतुक केल्यानंतर विदूर चहाला प्रचंड ऑर्डर मिळाल्या. देशातूनच नव्हे तर विदेशातूनही त्यांना ऑर्डर मिळू लागल्या.
