CJP Protest : जंतरमंतरवर CJP चा एल्गार, व्यापारी वर्गात धाकधूक; कनॉट प्लेसमधील दुकाने, रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचं आवाहन
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर, कनॉट प्लेसमधील दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

सीजेपी (CJP) अर्थात कॉकरोच जनता पार्टीने राजधानी दिल्लीत उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी आक्रमक असून याच पार्श्वभूमीवर,उद्या, शनिवार 10 ऑक्टेोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वीही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीने दिल्लीत जंतरमंतरवर मोठी आंदोलन केलं होतं. आताा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची देशभरातून मागणी होत असून एकीकडे ‘इंडिया’ आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे सीजेपीने देखील राजीनामा मागितला असून उद्या जंतरमंतरवर याची मागणीसाठी अभूतपूर्व आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, जंतरमंतर येथे उद्या , 10 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कनॉट प्लेस परिसरातील व्यापारी आस्थापनं, दुकान आणि कार्यालये उद्या बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली ट्रेडर्स असोसिएशनने (NDTA) परिपत्रक जारी करून दुकाने, रेस्टॉरंट्स आणि अन्य व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारी
सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनादरम्यान गर्दी वाढण्याची आणि अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी संघटनेकडून हे आवाहन करण्यात आलं आहे. आंदोलनाच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, तसेच दुकानांचे, कार्यालयांचे आणि अन्य मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळता यावे, यासाठी हे आवाहन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नवी दिल्ली ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भार्गव यांच्याकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. व्यापारी, दुकानदार आणि कार्यालय चालकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सूचनांचे पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.
कनॉट प्लेस हा राजधानीतील प्रमुख व्यापारी आणि व्यावसायिक परिसर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर दुकाने, रेस्टॉरंट्स, कार्यालये आणि विविध व्यावसायिक आस्थापनं आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही आस्थापनं बंद ठेवण्याच्या आवाहनामुळे या परिसरातील दैनंदिन व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
सीजेपी नेत्यांनी उडवली सरकारची खिल्ली
सीजेपीला उद्याच्या आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. जंतर मंतरवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असला तरी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहेत. एवढंच नव्हे तर नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेलवे स्टेशन ला येणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सीजेपीकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. सीजेपीचे अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी एका व्हिडीओतून सरकारवर निशाणा साधत त्यांची खिल्ली उडवली आहे.