CM विजय यांची ‘नायक’ स्टाइल कारवाई; एका झटक्यात बड्या IPS अधिकाऱ्याला पदावरून हटवलं
CM vijay : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या एका निर्णयाची जोरदार चर्चा आहे. त्यांनी दोन महिन्यात एका बड्या आयपीएस अधिकाऱ्याला पदावरून हटवलं आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूचे भ्रष्टाचार विरोधी संचालनालयाचे संचालक आणि वरिष्ठ IPS अधिकारी ए. अरुण यांना पदावरून हटवलं आहे. त्यांची दोन महिन्यांपूर्वी संबंधित पदावर नियुक्ती करण्यात आली होती, त्यानंतर आता त्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी आता IPS सी. मदेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस अरुण यांची आता तामिळनाडू पोलीस अकादमीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव के. मणिवसन यांनी जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार ही बदली तात्काळ लागू झाली आहे. डीव्हीएसीच्या विशेष पथकात असलेले मदेश्वरी यांना दक्षता आणि भ्रष्ट्राचारविरोधी संचालनालयाच्या संचालकपदाचा संपूर्ण अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडे केली होती तक्रार
विजय सरकारने ए. अरुण यांची डीव्हीएसीच्या संचालक म्हणून नियुक्ती केली होती. भ्रष्टाचारविरोधी प्रमुखपदी नियुक्ती केल्याने त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात चेन्नईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी टीव्हीके पक्षाच्या नेत्यांनी ते ‘डीएमके’ पक्षाचे समर्थक असल्याचा आरोप केला होता. पुढे विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षपातीपणा केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
कोर्टाने नमूद केलं होतं पदाचं महत्व
तत्पूर्वी, चेन्नईतील हायकोर्टानेही त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. भ्रष्टचाराचा कोणताही आरोप नसलेल्या आणि कोणत्याही वादात न सापडलेल्या अधिकाऱ्यांना हे पद दिले पाहिजे, असे कोर्टाने म्हटलं होतं. त्यांनी सी. व्ही. नरसिम्हन आणि सी. एल. राधाकृष्णन यांचं उदारण दिलं. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर कधीही आरोप झाला नसल्याचेही कोर्टाने नमूद केले. तसेच त्यांनी पदाचे महत्व अधोरिखित केले होते. दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालकाचे पद सर्वोच्च पात्रता असलेल्या अधिकाऱ्याकडे असले पाहिजे, असे कोर्टाने म्हटले. तसेच त्यांनी यावेळी पत्नीच्या चारित्र्याचंही उदाहरण सांगितलं. अधिकाऱ्यांची बदली केल्यानंतर आता मुख्यमंत्री थलपती विजय काय प्रतिक्रिया देतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.