Snake: लहान मुलाने विषारी सापाचा घेतला चावा, सापाचा झाला मृत्यू

सापाने चावल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र आता मुलाने एका सापाला चावले असता सापाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Snake: लहान मुलाने विषारी सापाचा घेतला चावा, सापाचा झाला मृत्यू
Snake
| Updated on: Jul 25, 2025 | 9:27 PM

सापाने चावल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मोहझी बंकटवा गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षाच्या गोविंद कुमार या मुलाला खेळताना एका विषारी नाग दिसला. गोविंदला वाटलं ते खेळणं आहे. त्यामुळे या लहान मुलाने या सापाचा दातांनी चावा घेतला. यानंतर काही वेळाने साप मरण पावला. तसेच काही वेळाने हा मुलगाही बेशुद्ध पडला होता, त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कुटुंबातील लोकांनी त्याला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी गोविंदवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती आणखी गंभीर झाली त्यामुळे त्याला बेतिया सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर डॉ. सौरभ कुमार हे त्याच्यावर उपचार करत आहेत. तसेच सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

या घटनेबाबत बोलताना गोविंदाची आजी मातेश्वरी देवी यांनी म्हटले की, बुधवारी गोविंदची आई लाकूड तोडण्यासाठी गेली होती, तिच्यापासून जवळच मुलगा खेळत होता. त्यावेळी त्याच्याजवळ एक विषारी साप आला. मात्र कोणाचेही लक्ष तिकडे नव्हते. त्यावेळी खेळत असताना गोविंदाने सापाला पकडले आणि दाताने त्याचा चावा घेतला. यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

डॉक्टर काय म्हणाले?

डॉक्टरांनी सांगितले की, लहान मुलाच्या चाव्यामुळे सापाच्या तोंडात किंवा डोक्यात गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर सौम्य विषबाधेमुळे मूल बेशुद्ध झाले. मात्र त्याला वेळेवर योग्य उपचार मिळाले, त्यामुळे ते बचावले. या मुलाचा जीव वाचल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तसेच अनेकांनी हा मुलगा नशीबवान आहे असं म्हटलं आहे.

एकाच घरात आढळले 60 साप

दुसऱ्या एका घटनेत बिहारमधील बगाहा भागातील लक्ष्मीपूर गावात एका घरातून सलग तीन दिवसांत 60 पेक्षा जास्त नाग आढळले आहेत. हे घर शेताला लागून आहे, त्यामुळे शेतातून साप या घरात आले असल्याचे समोर आले आहे.