मल्लिकार्जुन खर्गे यांनी अचानक भाषण थांबवलं, 2-3 नेते धावून आले; दिल्लीतील स्टेजवर नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात मल्लिकार्जुन खर्गे यांनी अचानक भाषण थांबवलं. त्यानंतर 2-3 नेते मदतीला धावून आले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्लीच्या रामलीला मैदानात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. इंडिया आघाडीच्या महारॅलीतून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या मंचावरून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अचानक भाषण थांबवलं. त्यानंतर दोन-तीन नेते धावत पळत आले. भाषण देताना माईकमध्ये बिघाड झाल्याने मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण थांबवलं. पुढील काही वेळात माईक सुरू झाल्यानंतर पुन्हा भाषण सुरू केलं.
नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न सुरू – खर्गे
इंडिया आघाडीच्या महारॅलीला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. या महारॅलीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्याचा नारा दिला. या रॅलीतील सभेत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘मोदीजी, फक्त तुमचे पोलीस काम करतात, असं समजू नका. तुम्ही सीबीआय मागे लावून घाबरवता. ईडीला मागे लावता. अनेक केंद्रीय यंत्रणा मागे लावता. आम्ही घाबरणारे नाहीत. आम्ही लढणारे नेते आहेत. आज लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा मतदानाचा अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना कोणी मतदान केलं पाहिजे, याची निवड करू लागले आहेत. जनता त्यांची निवड करत नाही. तर आता मतदार ठरवू लागले आहेत.
मल्लिकार्जुन खर्गेंनी दिला मोदी हटावचा नारा
‘आज केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार बिहार सरकार उत्तर प्रदेश हे चोरीचे सरकार आहेत. यांना हटवावे लागेल. चोरांची हकालपट्टी करावी लागेल. त्यासाठी तुमचा पाठिंबा हवा आहे. मोदी जाणार असले, तर लोकशाही राहील. मोदींना हटवा आणि लोकशाही वाचवा. तुम्ही सर्वांनी शांत ऐकून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाषणे ऐकावीत. मोदींना हटवण्यासाठी मजबुतीने लढुयात. आपण एकत्र येऊन लढुयात. मोदींना हटवुयात. लोकशाहीला मजबूत करुयात. देशाला बळकट करूयात, असं आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं.