सुशील कराडच्या अडचणी वाढल्या, पीडित महिलेचे गंभीर आरोप, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याच्या मुलाच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. मोठी बातमी समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याच्या मुलाच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच पोक्सोचे कलम आणि महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आता संबंधित पीडित महिलेकडून परळी पोलिसांवर आमचा विश्वास नाही, सोलापूर पोलिसांकडूनच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हटलं?
परळीतील सुशील कराडच्या विरोधात दाखल गुन्ह्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करा, परळी पोलिसांवर आमचा विश्वास नाही, सोलापूर पोलिसांकडूनच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सुशील कराड याच्या विरोधात फिर्याद देणाऱ्या महिलेनं आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, माध्यमांशी बोलताना पीडितेनं ही मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकारणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे द्यावा, परळी पोलिसांवर आमचा विश्वास नाही. या प्रकरणात विजयकुमार ससाने, सचिन सानप हे पोलीस देखील सहभागी होते. या प्रकारणाचा तपास सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांकडून व्हावा, ही आमची मागणी आहे. आमचा प्रचंड छळ करण्यात आला आहे, माझ्या पतीला मारहाण करण्यात आली. आमच्या गाड्या ओढून नेल्या, फ्लॅट देखील घेतले. या प्रकरणात आम्ही वाल्मिक कराडची देखील भेट घेतली होती, तेव्हा तो म्हणाला होता, सुशील कराडला समजून सांगतो.
या मारहाणीमध्ये माझ्या नवऱ्याच्या कानाचा पडदा फाटला होता, तेव्हा वाल्मिक कराड याने मला सांगितलं ऑपरेशन करून घ्या, तुम्ही परत आल्यावर सगळं परत देतो. पण आम्हाला काहीही परत मिळालेलं नाहीये. 2024 मध्ये आम्ही तक्रार दिली होती, पण राजकीय दबावामुळे काही झालं नाही. सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात, सोलापूर पोलीस आयुक्तालयात देखील तक्रार केली पण काही रिस्पॉन्स मिळाला नाही, म्हणून मी न्यायालयात गेले. सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांनी सोलापुरात येऊन आम्हाला मारहाण केली, फोनवर शिवीगाळ केली, असा आरोप या महिलेने केला आहे.
