सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

Sonia Gandhi Admitted to Hospital : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना शिमला येथील रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल!
Breaking News
| Updated on: Jun 07, 2025 | 7:16 PM

Sonia Gandhi Admitted to Hospital : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या तसेच काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना सध्या शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात त्यांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत.

सुट्टीसाठी गेल्या होत्या शिमल्यात

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार सोनिया गांधी यांचा इसीजी करण्यात आला आहे. तसेच त्यांचा एमआरआयही करण्यात आलाय. सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. सोनिया गांधी या गेल्या सोमवारी सुट्टीच्या काळात वेळ घालवण्यासाठी शिमला येथे गेल्या होत्या. त्या काँग्रेसच्या नेत्या तथा मुलगी प्रियांका गांधी यांच्या छराबडा येथील खासगी निवासस्थानी थांबल्या होत्या. मात्र तेथे अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना IGMC रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

चिंतेचे कारण नाही, प्रकृती स्थिर

सोनिया गांधी यांना IGMC मध्ये विशेष वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. रेडियोलॉजी विभागात त्यांचा एमआरआय करण्यात आलाय. सध्या रुग्णालय प्रशासन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्यविषयक किरकोळ समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. चिंतेचे काहीही कारण नाही, असे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द, शिमला शहराकडे रवाना

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्यानंतर शिमला येथे राजकीय घडामोडींना वेग आला. हिमाचल प्रदेशचे मुख्य सचिव प्रबोध सक्सेना यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. तसेच हिमाचल प्रदेशचे आरोग्यमंत्रीदेखील रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी रेडिओलॉजी विभागात जाऊन सोनिया गांधींच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हेदेखील त्यांच्या दोन दिवसीय उना दौऱ्याला रद्द करून थेट शिमलाकडे रवाना झाले आहेत. रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे.