
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत यांनी संजय दत्त यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘नायक नहीं खलनायक है तू, अपने पिता का नालायक है तू…’. असा हल्लाबोल संजय दत्त यांच्यावर सुरेंद्र राजपूत यांनी केला आहे, मात्र यावर अजून संजय दत्त यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.
संजय दत्त यांनी दोन ऑक्टोबर रोजी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता, या व्हिडीओमध्ये त्यांनी आरएसएसचं कौतुक केलं होतं.संघ सदैव देशासोबत उभा आहे, जेव्हा -जेव्हा देशामध्ये नौसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा -तेव्हा संघ देशासोबत उभा राहिला असं संजय दत्त यांनी म्हटलं होतं. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आता काँग्रेस समर्थकांकडून संजय दत्त यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे खासदार होते, तर संजय दत्त यांची बहीण प्रिया दत्त या देखील काँग्रेसच्या नेत्या आहेत. सोबतच त्या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत.
अभिनेते सजंय दत्त हे कायमच चर्चेत राहिले आहेत. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणापासून ते चर्चेत आले. त्यावेळी घरात अवैध पद्धतीनं शस्त्रं ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांना ताडा (TADA) अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ताडामधून निर्दोष सुटका करण्यात आली, मात्र घरात अवैध शस्त्रं ठेवल्याप्रकरणी ते दोषी आढळून आल्यानं त्यांना जेलमध्ये जावं लागलं. दरम्यान आता पुन्हा एकदा संघाचं कौतुक केल्यानं संजय दत्त चर्चेमध्ये आले असून, त्यांच्यावर काँग्रेस समर्थकांकडून टीका होत आहे.
संजय दत्त यांनी संघाचं कौतुक करतानाच व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. संघ कायम देशासोबत उभा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.