Azadi Ka Amrit Mahtosav : भारत छोडो आंदोलनात ‘रेडिओ काँग्रेसची’ होती महत्त्वाची भूमिका, पण नायक ठरला खलनायक ! जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

| Updated on: Aug 08, 2022 | 2:49 PM

जेव्हा भारतातील स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांविरोधात स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्याच वेळी देशात रेडिओ काँग्रेसचीही सुरुवात झाली होती. त्यातून अनेक स्वातंत्र्यसैनिक देशासाठी पुढे आले, मात्र एक नायक, खलनायकाच्या रुपात समोर आला.

Azadi Ka Amrit Mahtosav : भारत छोडो आंदोलनात रेडिओ काँग्रेसची होती महत्त्वाची भूमिका, पण नायक ठरला खलनायक ! जाणून घ्या संपूर्ण गोष्ट
Follow us on

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण (75th Independence day of India) झाली आहेत. यंदा 15 ऑगस्ट रोजी भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्यसैनिकांनी विविध मार्गांचा अवलंब करून इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडल. ब्रिटीश शासनाविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली, त्यातील सर्वात महत्वपूर्ण आंदोलन होते ‘भारत छोडो आंदोलन’.. (Quit India Movement) या आंदोलनाबद्दल आपण बरचं काही वाचलं असेलच, पण तुम्हाला हे माहीत आहे का, की याच आंदोलनादरम्यान देशात रडिओ काँग्रेसची (radio congress) सुरुवात झाली होती. आणि त्यामुळेच भारत छोडो आंदोलन अधिक मजबूत झाले. त्यामुळे अनेक क्रांतिवीर देशाला मिळाले. असंही म्हटलं जातं की जो व्यक्ती रेडिओ काँग्रेसचा नायक होता, त्याची ओळख खलनायक म्हणून झाली. रेडिओ काँग्रेस म्हणजे नक्की काय होतं, आधी नायक व नंतर खलनायक बनलेल्या या व्यक्तीची कहाणी नेमकी काय होती, ते जाणून घेऊया..

रेडिओ काँग्रेस म्हणजे काय ?

भारत छोडो आंदोलनादरम्यान 14 ऑगस्ट 1942 साली स्वातंत्र्य लढ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या दूरसंचार प्रणाली रेडिओचा वापर करण्यात आला होता. त्यालाच ‘रेडिओ काँग्रेस’ असे नाव देण्यात आले होते. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान, इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकांना अटक करण्यास सुरुवात केली होती, तसेच वर्तमानपत्रांवरही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळेच देशभरातील जनतेपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी काही क्रांतिवीरांनी रेडिओ काँग्रेस सुरू करण्याचा विचार केला. नरीमन अबराबाद प्रिंटर हे त्यामध्ये अग्रस्थानी होते.

इंग्लंडवरून रेडिओचे प्रशिक्षण

इंग्लंडवरून रेडिओ तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन आलेल्या नरीमन प्रिंटर यांनी रेडिओ स्टेशन बनवले. ते एका जुन्या ट्रान्समीटरच्या सहाय्याने  बनवण्यात आले. प्रथम 13 ऑगस्ट रोजी त्याची चाचणी घेण्यात आली व 14 ऑगस्ट रोजी ते प्रसारित करण्यात आले. ते 42.34 मीटर बँड्सवर होते , ज्याचे नाव ‘रेडिओ काँग्रेस’ असे ठेवण्यात आले. त्याद्वारे विविध नेत्यांनी त्यांच्या मनातील विचार लोकांसमोर मांडले. मात्र रेडिओ काँग्रेसचे प्रसारण केवळ 80 दिवसच झाले. पोलिसांपासून वाचवण्यासाठी ट्रान्समीटर वेगळ्या जागी हलवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

कोण होतो नरीमन प्रिंटर ?

नरीमन अबराबाद प्रिंटर यांचा जन्म रावळपिंडी येथे झाला होता. नरीमन प्रिंटर यांना रेडिओची आवड होती व त्यांनी रेकॉर्डिंग आणि संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील ट्रेनिंगसाठी ते 1936 साली लंडनला गेले. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतात परत आले व त्यांनी ट्रान्समीटर बनवला. पण इंग्रज सरकारच्या नियमांमुळे त्याचे प्रसारण झाले नाही आणि ते गॅरेजमध्ये पडून राहिले. त्यानंतर भारत छोडो आंदोलनादरम्यान हाच ट्रान्समीटर रेडिओ काँग्रेसच्या रुपात समोर आला. मात्र त्यानंतर प्रिंटर यांच्यावर आरोप लावण्यात आला की, त्यांच्यामुळेच रेडिओ काँग्रेस बंद झाले. एका टेक्निशिअनच्या गद्दारीमुळे अवघ्या 3 महिन्यातच रेडिओ काँग्रेस बंद झाले, असे रेडिओ काँग्रेसचा प्रमुख आवाज असणाऱ्या उषा मेहता यांनीही सांगितले. या रेडिओ प्रकरणावरून उषा मेहता यांना अनेक वर्ष तुरुंगात रहावे लागले. जर्मन अथवा जपानच्या तांत्रिक सहाय्यामुळे रेडिओ काँग्रेसची सुरुवात झाली, असा इंग्रजांचा समज होता.