Corona Vaccination : जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम, पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यांना किती लस?

| Updated on: Jan 16, 2021 | 10:21 AM

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील जवळपास 3 कोटी कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. देशभरातील लसीकरण मोहीमेवर आरोग्य मंत्रालयाकडून CoWin app द्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे.

Corona Vaccination : जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम, पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यांना किती लस?
Follow us on

नवी दिल्ली : भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मोहिमेचं उद्घाटन होईल. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील जवळपास 3 कोटी कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. देशभरातील लसीकरण मोहीमेवर आरोग्य मंत्रालयाकडून CoWin app द्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. या अॅपद्वारे लसीच्या साठवणुकीची माहिती, तापमान आणि लस दिल्या जाणाऱ्या व्यक्तीला ट्रॅक केलं जाऊ शकणार आहे.(How many vaccines to which states in the largest vaccination campaign?)

पहिल्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती लस?

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दिल्लीला 2 लाख 74 हजार, महाराष्ट्राला 9 लाख, आंध्र प्रदेशला 4 लाख 70 हजार लसीचे डोस मिळाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार केंद्राकडून दिल्लीला 2 लाख 74 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक व्यक्तीला लसीचे 2 डोस दिले जाणार आहेत. तर नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारकडून 10 टक्के अधिक कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत. या हिशेबानुसार दिल्लीला 1 लाख 20 हजार कोरोना योद्ध्यांना 2 लाख 74 हजार डोस मिळाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचं उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील कोविड केअर सेंटरमध्ये लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं जाणार आहे. BMC ने दिलेल्या माहितीनुसार शहरातील 9 लसीकरण केंद्रांवर प्रत्येक दिवशी 4 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते 161 केंद्रांवर कोरोना लस वितरित केली जाणार आहे. तर गुजरातमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते 700 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. तिकडे आंध्र प्रदेशात 332 केंद्रांवर कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. तेलंगणात आरोग्यमंत्री एटाला राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार 140 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आमदार आणि खासदारांना आपल्या मतदारसंघातील केंद्रांवर लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्याचं आवाहन केलं आहे.

तिकडे कर्नाटकात आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 243 केंद्रांवर कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 लाख 17 हजार 439 कोरोना योद्धांना लस दिली जाईल. तर केरळमध्ये 133 लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. तर तामिळनाडूमध्ये 166 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवली जाईल.

बर्फाळ प्रदेशात हेलिकॉप्टरने मदत

पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये लसीचे 1 लाख 46 हजार 500 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यात 79 हजार डोस काश्मीर तर 65 हजार 500 डोस जम्मूतील केंद्रांवर उपलब्ध आहेत. जम्मू-काश्मीरमधील दुर्गम आणि बर्फाळ प्रदेशात हेलिकॉप्टरच्या मदतीनं लसीचा पुरवठा केला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccination : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ, राज्यात पहिल्या दिवशी 28,500 कोरोनायोद्ध्यांना लस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी कोव्हिड लसीकरणाचा आज शुभारंभ

How many vaccines to which states in the largest vaccination campaign?