कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या; चांगल्या नोकरीसाठी आता वर्षभर वाट पाहा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. याचा थेट परिणाम रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर झाला आहे. | Coronavirus job income

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या; चांगल्या नोकरीसाठी आता वर्षभर वाट पाहा
बेरोजगारी
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 7:45 AM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकीकडे अनेकांनी जीव गमावले असताना दुसरीकडे आर्थिक स्तरावर आणखी गंभीर परिणाम पहायला मिळत आहेत. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील तब्बल 1 कोटी लोकांनी नोकऱ्या (Jobs) गमावल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्यावर्षी कोरोनाची साथ (Coronavirus pandamic) आल्यानंतर वर्षभरात जवळपास 97 टक्के कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न घटल्याचेही निदर्शनास आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) संस्थेने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. (Second wave rendered 1 crore Indians jobless 97% households’ incomes declined in pandemic says CMIE)

या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात 8 टक्के इतका होता. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत बेरोजगारीचा दर 12 टक्के होण्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. याचा थेट परिणाम रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ही स्थिती काहीप्रमाणात सुधारेल. मात्र, बेरोजगारीची समस्या इतक्यात पूर्णपणे सुटणार नाही, असे ‘सीएमआयई’चे मुख्याधिकारी महेश व्यास यांनी सांगितले.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेनं देशातील 1 लाख 75 हजार कुटुंबांची पाहणी केली होती. गेल्या वर्षी म्हणजेच मे 2020 मध्ये लॉकडाउनमुळे बेरोजगारीचा दर 23.5 टक्क्यांवर पोहोचला होता. पहिली लाट ओसरल्यानंतर अनलॉक करण्यात आला. त्यानंतर परिस्थिती बरीच सुधारली होती. मात्र, मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागला. त्यामुळे बेरोजगारी पुन्हा वाढल्याचे महेश व्यास यांनी सांगितले.

‘चांगल्या नोकऱ्यांसाठी वर्षभर वाट पाहावी लागणार’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नोकऱ्या गेलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळणे अवघड आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पुन्हा लगेच नोकऱ्या मिळतील. मात्र, संघटित क्षेत्रात तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असल्यास आता साधारण वर्षभर वाट पाहावी लागेल, असेही ‘सीएमआयई’चे मुख्याधिकारी महेश व्यास यांनी सांगितले.

‘अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर रोजगार वाढले पाहिजेत’

महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर तीन ते चार टक्के राहणे, सामान्य बाब आहे. मात्र, आता हा दर जवळपास 12 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारायची असेल तर प्रथम बेरोजगारीचा दर खाली आणला पाहिजे, असे व्यास यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मोदी सरकारचा नवा प्लॅन; आता दिवसाला 1 कोटी नागरिकांना लस देणार

Covaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य

Coronavirus: कोव्हॅक्सिन घेणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास मज्जाव?

(Second wave rendered 1 crore Indians jobless 97% households’ incomes declined in pandemic says CMIE)