दरवाढीची आग तर लागली, पण झळ बसणार नाय ! इलेक्शन हाय ना बाप्पा !

दरवाढीची आग तर लागली, पण झळ बसणार नाय ! इलेक्शन हाय ना बाप्पा !

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. मात्र देशातंर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यांच्या दरावर काहीएक परिणाम झाला नाही. दर वाढीची आग तर लागली आहे. पण देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने त्याचा थेट परिणाम इंधन दरवाढीवर दिसून आला आहे. निवडणुकांनी दरवाढ रोखली आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 19, 2022 | 1:08 PM

मुंबईः ‘इलेक्शन सबकुछ करवाता है ! ‘  सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे म्हणतात. पण सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी शहाणजोगपणा ठेवावा लागतो, हे ही तितकेच खरे. निवडणुकीचे विघ्न पार पाडण्यासाठी सत्ताधा-यांना काळजी घ्यावीच लागते. त्याचाच प्रत्यय भारतीय जनतेला सध्या येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. आठ वर्षांपूर्वी असलेले सर्वाधिक दर सध्या प्रति बॅरल मोजावे लागत आहे. तरीपण भारतीयांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इंधन दरवाढीचा सामना करावा लागत नाही. देशात पाच राज्यात इलेक्शन लागल्याने त्याचा थेट परिणाम इंधन दरवाढ रोखण्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींनी २०१४ नंतर पहिल्यांदा प्रति बॅरल 87 डॉलर्स ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. असे असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग 74 व्या दिवशीही कायम आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे मानक ब्रेंट क्रूड मंगळवारी 87.7 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. जागतिक पातळीवरील वाढता भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्यातील अडथळे यामुळे ही दरवाढ झाली आहे.

काय आहेत कारणे 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय मतभेद आणि बंडखोरांचे संकट यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीमधील तेल केंद्रावर हल्ला करून पुरवठा खंडित केला आहे.  या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील दोन शेजारी देश इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाचा पुरवठा आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जागतिक तेलाचे साठेही कमी होत आहेत, त्याचा ही परिणाम दिसून येत आहे.  डिसेंबर 2021 च्या अखेरीस कच्चे तेल प्रति बॅरल 68.87 च्या स्तरावर आले.तर, नवीन वर्ष सुरू होताच, ब्रेंट क्रूडच्या किमतीं पुन्हा वाढू लागल्या आणि आता तेल प्रति बॅरल 87.7डॉलर्सवर पोहोचले आहेत. 2014 नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.

दिवाळीनंतर दरवाढीला ब्रेक

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाही देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसत नाही. जवळपास अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 86.67 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राज्य सरकाराने त्यांच्या स्तरावर मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात आले. ऑक्टोबर अखेर पेट्रोलने 110 रुपये, तर डिझेलने 98 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. देशात जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एवढ्या उच्चांकावर होत्या, त्या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडचे दरही प्रति बॅरल 82 डॉलर्सच्या आसपास होते. तथापि, नंतर त्यात घट झाली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर

भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती निश्चित करण्याचे अधिकार सरकारने पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांना दिले आहेत. मात्र कच्च्या तेलाच्या  किमतीत वाढ होऊनही तेल कंपन्या देशांतर्गत दरात कसली ही वाढ करताना दिसत नाहीत.  देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन  तेलाच्या किंमतीत वाढ केली जात नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. यापूर्वी  2017 मध्ये या पाच राज्यांमध्ये झालेल्या  विधानसभा निवडणुकांमध्येही तेल कंपन्यांनी दर वाढवले नव्हते. पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान, 16 जानेवारी ते 1 एप्रिल 2017  पर्यंत तेलाच्या किमती स्थिर होत्या. काही महिन्यांनंतर डिसेंबर 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास दोन आठवडे वाढल्या नाहीत. 2019 मध्ये एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीतही तेल कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले होते.  मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली होती.  जून 2017  मध्ये सरकारने तेल कंपन्यांना दररोज तेलाच्या किंमतीत बदल करण्याचे अधिकार दिले आहेत.

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?

Agri | वायदे बाजार बंदी हटवा, जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्या; स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें