सावधन, वॅक्सिन रजिस्ट्रेशनच्या नावावर लागू शकतो चुना !

| Updated on: Jan 01, 2021 | 4:19 PM

सायबर गुन्हेगार लोकांना फोन करुन कोरोना लस तयार झाली असून त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे, अशी खोटी माहिती देत आहेत (Cyber crime on name of registration of corona vaccines)

सावधन, वॅक्सिन रजिस्ट्रेशनच्या नावावर लागू शकतो चुना !
Follow us on

मुंबई : तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरुन फोन आला, संबंधित व्यक्ती फोनवर कोरोना लसीचं (Corona Vaccine) रजिस्ट्रेशन करत असल्याचं सांगत असेल, त्यासाठी तो तुमच्या आधारकार्डचा नंबर, बँक खात्याशी संबंधित किंवा विमा पॉलिसीच्या कागदपत्रांची माहिती मागत असेल तर कृपया देऊ नका. कारण लसीच्या ऑनलाईन नोंदणीच्या नावावर लोकांना लुबाडण्याचा नवा धंदा सायबर गुन्हेगारांनी सुरु केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे (Cyber crime on name of registration of corona vaccines).

सायबर गुन्हेगार लोकांना फोन करुन कोरोना लस तयार झाली असून त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे, अशी खोटी माहिती देत आहेत. ते फक्त यावर थांबत नाहीत. तर या लसीची होम डिलिव्हरी केली जात असल्याची माहिती ते फोनवर देत आहेत. त्याचबरोबर ते लोकांकडून होम डिलिव्हरीसाठी पैसेदेखील मागत आहेत. काही भामटे तर लोकांना चिनी कंपनीने तयार केलेल्या कोरोना लसीच्या वितरणाला सुरुवात झाल्याचं सांगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर काही ठिकाणी बिटकॉईनमध्ये पैशांची मागणी केली जात असल्याचं समोर आलं आहे. या सायबर गुन्हेगारांकडून सरकारी योजनेचं नाव सांगत तुमच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे सतर्क राहण्याची जास्त आवश्यक आहे. याबाबत आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनीदेखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक घटना

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात अशाप्रकारच्या सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी गोरखपूर, देवरिया, बस्ती, मऊ, गाजीपूर, प्रतापगढमध्ये बहुतेक लोकांना फोन करुन त्यांची बँक खाते आणि विमा पॉलिसीशी संबंधित माहिती, तसेच आधारकार्ड नंबर मागितला. काही सर्वसामान्य नागरिक सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडले. त्यामुळे त्यांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत एका आरोग्य अधिकाऱ्याने प्रतिकिया दिली. “आरोग्य विभागाकडून लोकांना लसीच्या रजिस्ट्रेशनबाबत किंवा लसीकरणासाठी अद्याप कोणत्याही प्रकारचा फोन करण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. आरोग्य विभागाकडून अशा कोणत्याही प्रकारचा फोन केला जात नाही. लसीच्या लसीकरणाबाबत बोलायचं झाल्यास तर सुरुवातीला फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणजेच कोव्हिड योद्ध्यांना लस दिली जाईल. याबाबतचं लसीकरण या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारचे फोन आले तर कुणीही आपली वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नये. कारण यामुळे लोक सायबर गुन्ह्याचे बळी ठरु शकतात”, असं एका आरोग्य अधिकाऱ्याकडून नमूद करण्यात आलं आहे.

“कोरोना लसीच्या लसीकरण आणि रजिस्ट्रेशनच्या नावाने लुबाडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मी लोकांना विनंती करतो, लोकांनी या गोष्टींच्या बळी पडू नका”, असं आवाहन अतिरिक्त पोलीस महासंचालक दावा शेर्पा यांनी केलं (Cyber crime on name of registration of corona vaccines).

हेही वाचा : नव्या वर्षात गॅसचा भाव वाढला आणि गावात पुन्हा चूलीचा धुराडा