नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारला सर्वात मोठी खुशखबर

डिसेंबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून 1.15 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. डिसेंबर 2019 च्या तुलनेत हे उत्पन्न 12 टक्क्यांनी जास्त आहे. | GST collection

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:33 PM, 1 Jan 2021
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारला सर्वात मोठी खुशखबर

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे आर्थिक स्रोत आटलेल्या मोदी सरकारला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी खुशखबर मिळाली आहे. कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (GST) सरकारला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबरमधील महसूल हा 2020 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे. (GST collection in December 2020)

केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. डिसेंबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून 1.15 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. डिसेंबर 2019 च्या तुलनेत हे उत्पन्न 12 टक्क्यांनी जास्त आहे.

डिसेंबरमध्ये मिळालेल्या एकूण 1,15,174 कोटीच्या जीएसटीमध्ये 21,365 कोटींचा CGST आणि 27,804 कोटींचा SGST, 57,426 कोटींचा IGST आणि उपकराच्या माध्यमातून मिळालेल्या 8,579 कोटींचा समावेश आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून एकाच महिन्यात मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सरकारला 1,13,866 कोटींचा जीएसटी मिळाला होता.

जीएसटीची विक्रमी कमाई फक्त तीनवेळा

देशात वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत फक्त तीनदाच 1.1 लाख कोटीपेक्षा अधिक महसूलाचे संकलन झाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक जीएसटी संकलन झाले आहे.

हे अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत असल्याचे संकेत मानले जात आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत जीएसटी संकलनातील सरासरी वृद्धीचा दर 7.3 टक्के इतका होता. त्यापूर्वीच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत हा दर अनुक्रमे (-) 8.2 आणि (-) 41.0 टक्के इतका होता.

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis | केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला एकूण 28 हजार 104 कोटी रुपये, देवेंद्र फडणवीसांनी लेखाजोखा मांडला

राज्याला जीएसटीचे पैसे का मिळाले नाहीत? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

GST थकबाकी वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर, जीएसटी परिषदेत अजित पवारांकडून भीती व्यक्त

(GST collection in December 2020)