
गेल्या सोमवारी (10 नोव्हेंबर) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटामध्ये (Delhi Blast) 12 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही कित्येक जण गंभीररित्या जखमी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाप्रकरणी आत्तापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतशी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणात फरीदाबाद मॉड्यूल आणइ अल फनाह युनिव्हर्सिटीचे नावही समोर आले आहे. एवढंच नाही तर याप्रकरणात अटक करण्यात आलेली डॉ. शाहीन हिच्याबद्दलही बरेच खुलासे झालेत. ती 2013 साली थायलंडला गेल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कानपूरमधील नोकरी सोडल्यानंतर 2013 साली डॉ. शाहीन थायलंडलाही गेल्याचे उघड झाले आहे. तपास यंत्रणांना डॉ. शाहीन हिच्या ताब्यात तीन पासपोर्ट सापडले आहेत. एक पासपोर्ट कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचा आहे.
3 पासपोर्ट, तिन्हीवर वेगवेगळे पत्ते, पालकही वेगळे
या तपासात असं आढळून आलं की (दुसऱ्या पासपोर्टवरील) पत्ता लखनऊ आणि तिसरा पत्ता फरीदाबाद येथील आहे. तिन्ही पासपोर्टमध्ये पालकांचे नाव देखील वेगवेगळे आहे. एकात वडिलांचे नाव, दुसऱ्यावर पतीचं नाव तर तिसऱ्या पासपोर्टवर भावाचं नाव टाकून त्याला पालक म्हणून दाखवण्यात आलं आहे. सर्वात शेवटी बनवलेल्या पासपोर्टवर इंटीग्रल युनिव्हर्सिटीचा पत्ता जिथे शाहीनचा भाऊ परवेझ नोकरी करायचा. तपास संस्थांकडून शाहीनच्या परदेश प्रवासाच्या तपशीलांची देखील तपासणी केली जात आहे. पासपोर्ट तपासणीत शाहीनने आत्तापर्यंत 3 वेळा पाकिस्तानला आणि सहा वेळा इतर देशांना भेट दिल्याचे उघड झाले आहे.
6 डिसेंबरला होता धमाक्याचा प्लान
‘मॅडम सर्जन’ म्हणून ओळखली जाणारी शाहीन, व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलमध्ये एक प्रमुख साधन म्हणून काम करत होती. ‘D-6 Mission’ अंतर्गत 6 डिसेंबरला ब्लास्ट करण्याची योजना आखण्यात आली होती. 1992 साली बाबरी मशीद पाडण्यात आली होती, या स्फोटाद्वारे त्याचा बदला घेण्याची योजना आखण्यात आली होती. याच कारणामुळे धार्मिक स्थळे आणि आरएसएस कार्यालये त्यांचं टार्गेट होती. आतापर्यंत शाहीन, उमर आणि मुझम्मिल यांना हवालाद्वारे 20 लाख रुपये पोहोचल्याचे वृत्त आहे. या डॉक्टरांचे जे उत्तपन होते, त्याचा उपयोगही ते मिशनच्या कामात करत होते, तरीही त्यांनी स्वतःला लो-प्रोफाईल ठेवलं होतं. शाहीनची बँक डिटेल्स, ट्रॅव्हल हिस्ट्री, डिजिटल फूटप्रिंट्स, कॉल डिटेल्स आणि डायरीमधून एजन्सींना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
अल फलाह विद्यापीठावर होणार कारवाई ?
दिल्ली स्फोटानंतर अल फलाह विद्यापीठ चर्चेत आलं असून त्यावर बुलडोझर कारवाई होऊ शकते असे मानले जात आहे.विद्यापीठाच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत ही कारवाई केली जाऊ शकते. अलिकडेच प्रशासनाने विद्यापीठाच्या जमिनीचे सर्वेक्षण केले. विद्यापीठ विस्ताराच्या नावाखाली भूसंपादन केल्याचे आरोप करण्यात आले होते. फरिदाबाद गुन्हे शाखेने जमिनीच्या कागदपत्रांचीही तपासणी केली आहे.