Delhi Blast : स्फोटानंतर 500 मीटर दूर छतावर सापडला तुटलेला हात.. हृदयविदारक दृश्य !

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला तीन दिवस उलटून गेले असून या प्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत, बरीच माहितीही समोर येत आहे. आता तीन दिवसानंतर स्फोट झालेल्या जागेपासून 500 मीटर दूर अंतरावर एक तुटलेला हात पडलेला सापडला आणि ते पाहून लोकं स्तिमित झाले. स्फोटाची भीषणा तीव्रता दर्शवणारी ही दृश्य पाहून कोणालाच चैन पडत नाहीये.

Delhi Blast : स्फोटानंतर 500 मीटर दूर छतावर सापडला तुटलेला हात.. हृदयविदारक दृश्य !
दिल्ली स्फोट अपडेट्स
| Updated on: Nov 13, 2025 | 10:36 AM

सोमवार, 10 नोव्हेंबरची संध्याकाळ, 7 च्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ रस्त्यावर कारमध्ये भीषण (Delhi Blast) स्फोट झाला आणि क्षणात आजूबाजूच्या लोकांच्या चिंधड्या उडाल्या. हा स्फोट एवढा भयानक होता, त्याची तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही त्यामुळे क्षत-विक्षत झालेले मृतदेह, शरीराचे भाग इकडे तिकडे विखुरलेले दिसत आहेत. लाल किल्ल्यापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील एका गेटच्या छतावर तुटलेला हात आढळला असून ते पाहून कोणाच्याही तोंडून शब्दच फुटत नाहीये. तीन दिवस उलटूनही लोकांच्या मृतदेहाचे वेगेवगळ्या ठिकाणी सापडत असून विदारक दृश्य आहे.

त्यातच स्फोटाच्या ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर शरीराचा हा तुकडा सापडल्याने खळबळ माजली. हा हात सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तो ताब्यात घेतला आणि तो संपूर्ण परिसर बंद केला. लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात, वाहनांसह, प्रचंड नासधूस झाली. अनेक कार उद्ध्वस्त झाल्या, 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. 10 नोव्हेंबरच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन अहवालही समोर आले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या शरीराच्या अतर्गत भागांवर स्फोटाचा किती तीव्र परिणाम झाला ते त्यातून दिसून आलं.

 

पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

दिल्ली स्फोटात आधी 10 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले. मात् आता मृतांचा आकडा वाढून 12 वर पोहोचला आहे. स्फोटात मृतांची हाडं तुटल्याचे आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे या मृतांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये दिसून आले. सोमवारी झालेला हा स्फोट इतका शक्तिशाली होता की काही मृतदेहांची आतडी आणि कानाचे पडदे फाटलेलेही आढळले. स्फोटामुळे पोटाच्या आतही खूप नुकसान झाल्याच्या खुणा आहेत.

जोरदार धमाक्यामुळे मृतांचे कानाचे पडदे, फुफ्फुसे आणि आतडंही फाटल्याचं आढळलं. या स्फोटामुळे लोकांच्या शरीरावर कसे परिणाम झाला आणि काही क्षणातच त्यांची कशी विकृत अवस्था झाली हे त्यावरून दिसून आलं आहे. शवविच्छेदन अहवालात असेही दिसून आले की मृतांचे बरेच रक्त वाहून गेलं. स्फोटामुळे त्यांचे शरीर भिंतींवर आदळले आणि त्यामुळे भयानक जखमाही झाल्या.

उमरचं डीएनए सँपल झालं मॅच

दरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा, कारमध्ये बसलेल्या उमरचं डीएनए सँपल हे त्याच्या आईच्या डीएनएशी जुळवून पाहण्यात आलं, दोघांचही सँपल मॅच झालं. त्यावरून कारमध्ये बसलेल्या डॉ. उमरचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्फोटावेळी तो कारमध्येच बसला होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमर याच्या आईचे डीएनए नमुने हे i20 कारमध्ये सापडलेली हाडं आणि दातांच्या डीएनए नमुन्यांशी जुळले आहेत. त्यावरूनच हे स्पष्ट झालं आहे की कार स्फोटाच्या वेळी उमर कारमध्ये उपस्थित होता आणि त्याचाही त्याच स्फोटात मृत्यू झाला.