
देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटामुळे (Delhi Blast) सगळेच हादरले असून नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी आहेत. दरम्यान या स्फोटानंतर देशातील सर्व एजन्सीज तपासाला भिडल्या असून सतत छापे टाकले जात आहेत. तसेच या स्फोटात हात असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. या स्फोटपूर्वी सुरक्षा एजन्सींनी काही डॉक्टर्सना अटक केली होती. त्यापैकी एक होती फरिदाबादमधून अटक करण्यात आलेली डॉ. शाहीना शाहिद. तिच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले असून ते या स्फोटाच्या तपासादरम्यान खूप महत्वाचे ठरणार आहेत.
भारतात जैश-ए-मोहम्मदच्या महिला कमांडचे नेतृत्व करणारी डॉ. शाहीन शाहिद ही गेल्या दोन वर्षांपासून स्फोटके गोळा करत होती. सूत्रांच्या सांगण्यानुसार, तपासादरम्यान तिने या गोष्टीची कबुली दिली. ती व तिचे साथीदार डॉक्टर्स हे गेल्या दोन वर्षांपासून भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखत असल्याचेही तिने कबूल केलं. एजन्सीकडून शाहीन शाहिदची सतत चौकशी केली जात आहे. विशेषतः दिल्ली बॉम्बस्फोटांबाबत एजन्सी शाहीनची चौकशी करत आहे. या चौकशीतून आणखी बरेच खुलासे होऊ शकतात असे मानले जाते.
जैश-ए-मोहम्मदच्या इशाऱ्यावर सुरू होतं काम
चौकशीत शाहीनने सांगितलं की जेव्हा जेव्हा ती डॉ. उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने सांगायच की, तो देशभरात असंख्य दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत आहे. डॉ. शाहीना ी मुझम्मिल आणि आदिलसह, दोन वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटके गोळा करत होती. या सर्व कारवाया दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या इशाऱ्यावर केल्या जात होत्या. .
कारमध्ये होता डॉ. उमर
सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाच्या आय-20 कारचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. मेट्रो स्टेशन पार्किंगमधून बाहेर पडणाऱ्या कारमध्ये काळा मास्क घातलेला एक माणूस बसलेला दिसला. तो काश्मीरचा रहिवासी डॉ. उमर नबी असल्याचे मानले जात आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर, फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ हेदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. सात डॉक्टरांसह तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे.